वसईत ओणम उत्साहात
By Admin | Updated: September 8, 2014 00:36 IST2014-09-08T00:36:20+5:302014-09-08T00:36:20+5:30
वसई विरार परिसरात आज ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरळीय नागरीक वसई-विरार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी हा सण जोशात साजरा केला जातो.

वसईत ओणम उत्साहात
वसई : वसई विरार परिसरात आज ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरळीय नागरीक वसई-विरार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी हा सण जोशात साजरा केला जातो. वसई एव्हरशाईन सिटी येथे आज सणाच्या निमित्ताने केरळीय व अन्य
धर्मीय नागरीक एकत्र आले होते व त्यांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
ओणम सण हा केरळवासीयांचा अत्यंत लोकप्रिय सण आहे. पावसाळा संपल्यानंतर हा सण येतो. पुरातन काळी केरळवर राजा महाबलीचे राज्य होते. महाबली राजाची ओळख न्यायप्रिय, दयाळू व आपल्या प्रजेचे हित पाहणारा राजा अशी होती. दरवर्षी ओनम सणाच्या दिवशी महाबली राजा आपल्या प्रजेची खुशाली विचारण्यासाठी त्यांच्या घरी फेरफटका मारीत असे. त्याच्या स्वागतासाठी केरळीय लोक आनंदात हा सण साजरा करत असत. गेली अनेक वर्षे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
केरळ राज्यात या दिवशी नौकास्पर्धा तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जातात. आज वसई-विरार परिसरातील एव्हरशाईन सिटी येथे केरळीय समाजाने ओनम सण साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास केरळीय समाजासहीत अन्य धर्मीय नागरीकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. (वार्ताहर)