वसईवर पाणी, विजेचे दुहेरी संकट

By Admin | Updated: July 7, 2014 01:37 IST2014-07-07T01:37:33+5:302014-07-07T01:37:33+5:30

वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, तलासरी व मोखाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

Vasai water, electricity double crisis | वसईवर पाणी, विजेचे दुहेरी संकट

वसईवर पाणी, विजेचे दुहेरी संकट

दीपक मोहिते, वसई
वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, तलासरी व मोखाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरी व ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे कारखानदार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी चर्चा, महावितरणच्या कार्यालयावर मोर्चे नेणे अशा लोकशाही मार्गाने महावितरण व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.
गेले ४ महिने पाणीटंचाईत होरपळत असलेल्या या उपविभागातील अनेक तालुक्यांना आता विजेच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीज भारनियमन बंद झाले असले तरी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. वीज खंडित होण्याचे तास जर मोजले तर विजेच्या भारनियमनापेक्षाही अधिक काळ वीजपुरवठा बंद असतो. मागच्या दाराने एकप्रकारे विजेचे छुपे भारनियमन सुरू असते, त्यामुळे नागरिकांत संताप वाढला आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हॉस्पिटल, कारखाने, किरकोळ दुकाने व सरकारी कार्यालयातील कामकाज दिवसेंदिवस विस्कळीत होत चालले आहे. एकीकडे पाणीटंचाई, तर दुसरीकडे वीजटंचाई अशा दुष्टचक्रात हा संपूर्ण उपप्रदेश सापडला आहे.
ग्रामीण भागातील शेतीचे पंपही विजेअभावी बंद असल्यामुळे शेतीला पाणी कसे द्यायचे? अशा विवंचनेत शेतकरी आहेत. निसर्गाची अवकृपा व नोकरशाहीचा अंदाधुंद कारभार अशा दुहेरी संकटामुळे ग्रामीण भागातील जनतेची सध्या ससेहोलपट सुरू आहे. या प्रश्नावर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने छेडली तर काही लोकप्रतिनिधींनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे दिसत आहे.

Web Title: Vasai water, electricity double crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.