मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी, लेखक व पत्रकार वरवरा राव यांचा विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (८१) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. २६ जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला.राव यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांचे वकील आणि पत्नीचे म्हणणे आहे. राव यांनी तळोजा कारागृहातून शनिवारी कुटुंबीयांना फोन केला होता आणि त्या वेळी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे. दरम्यान, जे.जे. रुग्णालयाने सांगितल्याप्रमाणे तळोजा कारागृह राव यांची वैद्यकीय चाचणी करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.राव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यानुसार कारागृह प्रशासनाने केलेले उपचार याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृहाला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच राव यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या भीतीपोटी वरवरा राव यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 02:48 IST