Maharashtra Monsoon Session 2025: ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यासोबत विधिमंडळाच्या आवारात धक्काबुक्की घडल्याचा प्रकार समोर आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. या धक्काबुक्कीनंतर सरदेसाई चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे नीलम गोऱ्हे यांनी बाजू मांडतांना हे जाणूनबुजून घडलेले नाही असं म्हटलं. मात्र हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याचे वरुण सरदेसाई म्हणाले. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे विधिमंडळ परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विधान परिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे बदलापूर प्रकरणावरुन पोडियमवर प्रतिक्रिया देत होत्या. नीलम गोऱ्हे प्रतिक्रिया देऊन असताना त्यावेळी वरुण सरदेसाई तिथे आले. यावेळी निलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आली असा दावा वरुण सरदेसाईंनी केली. सुरक्षा रक्षकांच्या धक्काबुक्कीमुळे सरदेसाई चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याचे म्हणत इथे काय अतिरेकी घुसलेत का? असा सवाल वरुण सरदेसाईंनी केला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडे तुम्ही कोणाला काही केलंय का, तुम्ही कोणाला हात लावला का अशी विचारणा केली.
त्यावर बोलताना वरुण सरदेसाई यांनी मॅडम येताना मला दुसऱ्यांदा धक्के बसलेत, असं म्हटलं. तसेच तेव्हा सारखे कसे काय धक्के लागतात असंही सरदेसाई म्हणाले. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी मी नम्रपणे सांगते हा काही जाणूनबुजून घडलेला नाही, मी हा प्रकार मुद्दामहून झालेला नाही, असं सांगत आहे. तरीही तुम्ही माझ्यासमोर खेकसतायं? ही कोणती तुमची संस्कृती? असं म्हटलं आणि निघून गेल्या.
यानंतर वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. "आमदार म्हणून कोणी आम्हाला ओळखत नसेल, तर या आवारामध्ये आमदार म्हणून आम्हाला ओळखावे म्हणून आम्ही बिल्ले लावतो. हवे तर उपसभापतींसाठी स्वतंत्र बस काढा किंवा त्यांचे विमान थेट विधान भवनात उतरवा. यांच्यासोबत कोणीही ओम्या-गोम्या-सोम्या येतो आमदारांना धक्के देतो, हे धंदे आता बंद करा. विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील नागरिक येत असतात. या सर्व गर्दीमध्ये आमदारांना ओळखता यावे म्हणूनच आमदारांना बॅच दिलेले आहेत. त्यासाठीच आमदार बॅच लावून फिरत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी कमीत कमी आमदारांचा बॅच पाहून तरी त्यांना रस्ता मोकळा करून द्यावा," असं वरुण सरदेसाई म्हणाले.
"सुरक्षा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची, हा सरकारचा विषय आहे. हा माझा विषय नाही. मात्र विधान भवनाच्या आवारामध्ये आमदारांना सन्मान मिळायला हवा. उपसभापती असतील किंवा इतर कोणाचे सुरक्षा रक्षक किंवा कार्यकर्त्यांनी आमदारांना धक्काबुक्की करणे योग्य आहे का? याचे उत्तर मिळायला हवं. हे या आधी देखील घडले होते. मात्र, मला धक्काबुक्की झालेली नाही. गेल्या वेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील मी उभा असताना एका सुरक्षारक्षकाने मला बाजूचा करण्याचा प्रयत्न केला होता," असंही सरदेसाईंनी म्हटलं.