Join us  

स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाच्या प्रतीक्षेत वेसावे कोळीवाडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:52 PM

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्याला मोठे महत्व आहे.आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना  वेसावे कोळी वाड्यातील स्वतंत्र्य लढ्याची महती समजावी यासाठी येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक वेसावे सुमुद्रकिनारी  उभारावे अशी वेसावकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

-  मनोहर कुंभेजकर

मुंबई -  देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्याला मोठे महत्व आहे.आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना  वेसावे कोळी वाड्यातील स्वतंत्र्य लढ्याची महती समजावी यासाठी येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक वेसावे सुमुद्रकिनारी  उभारावे अशी वेसावकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौफूट मोकळ्या जागेवर हे स्मारक झाले पाहिजे अशी मागणी येथील माजी नगरसेवसक व जेष्ठ माच्छिमार नेते मोतीराम भावे यांनी 1999 साली माजी महापौर हरेश्वर पाटील यांच्याकडे केली होती. मात्र अजून येथे सदर स्मारक उभारले गेले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासात अंधेरी(प)पासून ७ किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला मोठे ऐतिहासिक महत्व आहे.येथील सुमारे ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरीधात तीव्र लढा देऊन तुरुंगवास देखील भोगला.यामध्ये येथील कोळी महिलांनी देखील सहभाग घेतला होता.भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची येथील समुद्रकिनारी ११ नोव्हेंबर १९४५ साली विराट जाहिर सभा झाली होती.त्यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू असतील अशी घोषणा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केली होती.येथील कै.पोशां नाखवा यांना ब्रिटीशांनी तर टायगर ऑफ वर्सोवा अशी उपाधी दिली होती.त्यांच्या नावाने यारी रोड येथे पालिकेची शाळा आहे.येथील ११४ स्वातंत्र्य सैनिकांपैकी एकही स्वातंत्र्य सैनिक आज हयात नाहीत.मात्र त्यांचे साधे स्मारक अजून वेसाव्यात झालेले नाही अशी खंत देखील कोळी समाजाचे गाढे अभ्यासक भगवान भानजी यांनी व्यक्त केली. आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना त्यांची महती समजावी यासाठी येथील स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक येथील सुमुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीच्या ४५०० चौफूट मोकळ्या जागेवर झाले पाहिजे.१९७८ ते १९९२ पर्यंत येथील नगरसेवक आणि जेष्ठ मच्छीमार नेते मोतीराम भावे यांच्या प्रयत्नाने वेसावकरांना समुद्रकिनारी स्मशानभूमी मिळाली.सध्या ४५०० चौमीटर जागेवर सदर स्मशानभूमी ऊभी असून उर्वरित ४५०० चौमीटर जागेवर पालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण झाले आहे.या जागेत स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक झाले पाहिजे ही वेसावकरांची जुनी मागणी असल्याचे मत भाजपाचे वर्सोवा विधानासभेचे सरचिटणीस पंकज भावे यांनी व्यक्त केले आहे.वर्सोवा  विधानसभेच्या भाजपा आमदार  डॉ भारती  लव्हेकर  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे दाद मागून याप्रकरणी जातीने  लक्ष  घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक होणे हे माझ्यासाठी खूप जिव्हाळाच्या विषय आहे.मी माझ्या आमदार निधीतून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली आहे,तसेच स्मारकाच्या जागेसाठी देखिल पाठपुरावा करत आहे.आपल्या कारकिर्दीत येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक उभे राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रबातम्या