थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांच्या विविध व्यूहरचना
By Admin | Updated: December 30, 2014 01:44 IST2014-12-30T01:44:01+5:302014-12-30T01:44:01+5:30
थर्टीफस्टनिमित्त गर्दी खेचणारी शहरातील सुमारे २५ ठिकाणांची यादी मुंबई पोलिसांनी तयार केली असून तेथे नववर्षस्वागताला अनुचित घटनेने गालबोट लागू नये यासाठी व्यूहरचना आखली आहे.
थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांच्या विविध व्यूहरचना
मुंबई : थर्टीफस्टनिमित्त गर्दी खेचणारी शहरातील सुमारे २५ ठिकाणांची यादी मुंबई पोलिसांनी तयार केली असून तेथे नववर्षस्वागताला अनुचित घटनेने गालबोट लागू नये यासाठी व्यूहरचना आखली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासह येणाऱ्यांना स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करणार आहेत. जोडीला मुबलक प्रकाश योजना, सीसीटीव्ही यंत्रणा आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारी अॅन्टी इव्हटिझिंग स्क्वॉड अशी योजना मुंबई पोलिसांनी आखली आहे.
दरवर्षी थर्टीफस्टला नववर्ष स्वागतासाठी गेट वे आॅफ इंडियासह शहरातील सर्वच चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांवर मुंबईकर गर्दी करतात. अशा ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. तेथे मुबलक प्रकाश योजना आणि सीसीटीव्हींचे जाळे उभारण्यासाठी पालिकेची मदत घेतली जात आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासह येणारे आणि पुरूषांचे ग्रुप स्वतंत्र राहतील, असा प्रयत्न सुरू असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.
गेटवे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातली अॅन्टी टेररीस्ट सेल, अॅन्टी इव्ह टिझिंग स्क्वॉड तैनात असतील. इव्ह टिझिंग स्क्वॉडमधील महिला अधिकारी कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी तसेच पब, रेस्टॉरेन्ट, लाऊंज या ठिकाणी जमलेल्या गर्दीत मिसळून तेथील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवतील.
पब, नाईट क्लबमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी आयोजित करणाऱ्यांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. अशा ठिकाणी आयोजक किंवा मालकांनी सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच शहरातील शक्तीमीलप्रमाणे निर्जन, अंधाऱ्या ठिकाणांचीही यादी पोलिसांनी तयार केली आहे. अशी २७८ ठिकाणे आहेत. तेथे प्रकाश योजना करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. वाहतूक पोलीसही थर्टीफस्टसाठी सज्ज झाले आहेत. १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरात सुमारे ७० ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक पोलीस वाहनचालकांची झाडाझडती घेणार आहेत. बंदोबस्तासाठी पोलिसांची सुटी रद्द करण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी गेटवे आॅफ इंडियाभोवती नो बोटिंगच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
दारू पिऊन वाहन चालविणारा सापडल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई पोलिस करणार आहेत. दारू पिणाऱ्या वाहनमालकांना सुरक्षितपणे घरी सोडण्यासाठी पर्यायी चालकाची व्यवस्था करावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी बार, पबचालकांना केल्या आहेत.
सतर्कतेचा इशारा : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्व पोलीस ठाणी, गुन्हे शाखा आणि विशेष शाखांना सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील संवेदनशील, महत्त्वाच्या वास्तू, प्रार्थनास्थळे, गर्दी खेचणाऱ्या बाजारपेठा, मॉल, रेल्वे स्थानके या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे.