पैसे परत घेण्यावरून वेणगावमध्ये हाणामारी
By Admin | Updated: February 15, 2015 22:56 IST2015-02-15T22:56:19+5:302015-02-15T22:56:19+5:30
तालुक्यातील मोठे वेणगाव येथे एका दुकानदाराकडे चाळीस रु पये परत घेण्यावरून हाणामारी झाली तर दुसरी घटना सिगारेट उधार

पैसे परत घेण्यावरून वेणगावमध्ये हाणामारी
कर्जत : तालुक्यातील मोठे वेणगाव येथे एका दुकानदाराकडे चाळीस रु पये परत घेण्यावरून हाणामारी झाली तर दुसरी घटना सिगारेट उधार मागण्यावरून त्याच ठिकाणी झाल्याने दोन्हीकडील लोकांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन घटनांमधील एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, तर अन्य चार जण जखमी असल्याने कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मोठे वेणगाव बौद्धवाड्यातील विनोद दामू भालेराव पालकर यांच्या बियर शॉपीमधून उरलेले ४० रुपये मागितल्यावरून दुकानदार बबन हरिभाऊ पालकर यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली व कवीश्वर बबन पालकर, स्वप्नील बबन पालकर, भूषण भगवान पालकर आणि प्रसाद संभाजी पालकर यांनी मारहाण केली. याबाबत भालेराव यांनी या पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कवीश्वर पालकर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दुसरी घटना मोठ्या वेणगावमध्येच घडली. बबन पालकर आपल्या किराणा मालाच्या दुकानासमोर उभे असताना बौद्धवाड्यातील सुभाष नामदेव गवळे, विनोद दामू भालेराव आणि उत्तम हश्या सोनावणे दुकानदार कवीश्वर बबन पालकर यांच्याकडे सिगारेट उधार मागण्यासाठी गेले होते. सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने सुभाष गवळेने गाडीतील लोखंडी गज घेऊन बबन पालकर यांच्या डोक्यात गजाचा फटका मारला. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भूषण पालकर यालाही गजाने मारहाण केली. जखमींना कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील करीत आहेत. (वार्ताहर)