मतदानामुळे सराईत गुंड अडकला पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: October 16, 2014 16:40 IST2014-10-16T16:22:54+5:302014-10-16T16:40:35+5:30
खंडणी, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांप्रकरणी फरार असलेला रफिक शेख हा आरोपी मतदानासाठी गोवंडीतील मतदानकेंद्रावर पोहोचला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

मतदानामुळे सराईत गुंड अडकला पोलिसांच्या जाळ्यात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्याचा सराईत गुंडाचा निर्णय पोलिसांच्या पथ्यावर पडला आहे आहे. खंडणी, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांप्रकरणी फरार असलेला रफिक शेख हा आरोपी मतदानासाठी गोवंडीतील मतदानकेंद्रावर पोहोचला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
चेंबूरजवळील शिवाजीनगर परिसरातील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका नूरजहां शेख यांचे पती रफिक शेख हे सराईत गुंड आहेत. शेखचा अधिकृत व्यवसाय केबलचा असला तरी परिसरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असतो. हिस्ट्री शीटर भाऊ अतिक शेखसोबत मिळून रफिकने विभागात दहशत निर्माण केली होती. हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा १६ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून पोलिसांना चकवा देण्यात तो नेहमीच यशस्वी ठरत होता. रफिकने अटकपूर्व जामीनासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावल्यापासून तो फरार झाला होता.
बुधवारी रफिक गोवंडीतील संजयनगर येथील महापालिका शाळेत मतदान करण्यासाठी पोहोचला. याच शाळेत गोवंडी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल कमलेश हांडे बंदोबस्तावर होते. हांडे हे पूर्वी शिवाजीनगरमध्ये ड्यूटीवर होते व तिथे असताना त्यांनी अनेकदा रफिकविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास केला होता. बुधवारी रफिक मतदान केंद्रावर येताच हांडेंनी त्याला ओळखले. हांडेंना बघून रफिकही तिथून पळायला गेला. मात्र यात तो अपयशी ठरला. हांडे यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनीदेखील हांडेच्या कामाची दखल घेत त्यांना पारितोषिक जाहीर केले आहे. पोलिस बंदोबस्तात रफिकने मतदान केले आणि त्यानंतर त्याची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली.