लोकलमध्ये महिलांवर गर्दुल्ल्याचा हल्ला
By Admin | Updated: August 22, 2015 01:12 IST2015-08-22T01:12:34+5:302015-08-22T01:12:34+5:30
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकीकडे नवीन बदल रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) केले जात असतानाच दुसरीकडे महिला प्रवाशांचा प्रवास हा असुरक्षितच असल्याचे पुन्हा

लोकलमध्ये महिलांवर गर्दुल्ल्याचा हल्ला
मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकीकडे नवीन बदल रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) केले जात असतानाच दुसरीकडे महिला प्रवाशांचा प्रवास हा असुरक्षितच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सकाळच्या सुमारास डोंबिवली-सीएसटी धावत्या जलद लोकलमध्ये भर गर्दीत गर्दुल्ल्याने एका महिला प्रवाशावर हल्ला केला. हा हल्ला होताच उपस्थित महिला प्रवाशांनी या गर्दुल्ल्याला चोप देऊन कुर्ला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. धावत्या लोकलमध्ये आणि भर गर्दीतल्या या प्रकाराने महिला प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट पसरली.
सकाळी ६.१७च्या सुमारास डोंबिवलीहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलच्या फर्स्ट क्लास महिला डब्यात दुर्गा राय (१९) हा गर्दुल्ला चढला. मात्र महिला डब्यात चढताच उपस्थित महिलांनी त्याला उतरण्यास सांगितले. महिला प्रवाशांचा विरोधाकडे राय याने दुर्लक्ष केले. त्यानंतर ठाणे स्थानक सोडताच राय याने एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील चेन आणि हातातील मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उपस्थित महिलांनी त्याला विरोध केला आणि चोप दिला. त्यानंतर कुर्ला स्थानकात आरपीएफ आरोपी राय याला ताब्यात घेण्यासाठी हजर राहिले. कुर्ला स्थानकात महिला प्रवासी राय याला घेऊन उतरल्या आणि त्यांनी आरपीएफच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरपीएफकडून राय याला तत्काळ कुर्ला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गा राय हा गर्दुल्ला असून, तो दिवा येथे राहतो, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली. याबाबत अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले.