वाशीत अनधिकृत बांधकामांचे पेव
By Admin | Updated: July 13, 2015 23:30 IST2015-07-13T23:30:06+5:302015-07-13T23:30:06+5:30
शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेने तक्रार नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पदनिर्देशित अधिकारी म्हणून विभाग

वाशीत अनधिकृत बांधकामांचे पेव
नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेने तक्रार नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पदनिर्देशित अधिकारी म्हणून विभाग अधिकाऱ्यांवर कारवाईची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे असले तरी वाशी विभागात आजही बिनदिक्कत बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे फेरीवालेही मोकाट सुटले आहेत. विभागातील बहुतांशी प्रमुख पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या प्रकाराबाबत विभाग कार्यालयाने चुप्पी साधल्याने भूमाफिया आणि फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे.
शहरात सध्या अनधिकृत बांधकामांचा विषय गाजत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरू केली आहे. शहराचे नियोजन प्राधिकरण या नात्याने महापालिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विभाग अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करून त्यांना आपापल्या विभागातील अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु त्यानंतरही अनेक भागांत अतिक्रमणांचा धडाका सुरूच आहे. वाशी विभागात तर अनेक ठिकाणी सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
विशेषत: विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुहूगावात पुन्हा फिफ्टी फिफ्टीच्या बांधकामांनी तोंड वर काढले आहे. त्याचप्रमाणे कोपरी व वाशी गावातही मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे सुरू आहेत. कोपरखैरणेकडे जाणाऱ्या मार्गावरील अग्निशमन चौक ते जुहू गावापर्यंतचे पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. वाशी सेक्टर १७मध्येही फेरीवाल्यांनी महापालिकेला आव्हान दिले आहे.
वाशीचे विभाग अधिकारी राजेंद्र चौगुले हे कार्यालयात असूनही म्हणणे ऐकून घेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नक्की कोणाकडे दाद मागायची, असा सवाल वाशीकरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, चौगुले यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही. (प्रतिनिधी)