वाशी पोलिसांचे ‘दिवे’
By Admin | Updated: May 7, 2015 00:32 IST2015-05-07T00:32:30+5:302015-05-07T00:32:30+5:30
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. अनेक चौक्यांना मीटर बसविण्यात आले नसून शेजाऱ्यांकडून वीजजोडणी घेतली आहे.

वाशी पोलिसांचे ‘दिवे’
कमलाकर कांबळे, नामदेव मोरे
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. अनेक चौक्यांना मीटर बसविण्यात आले नसून शेजाऱ्यांकडून वीजजोडणी घेतली आहे. वीज कायद्यानुसार हा गुन्हा असून संबंधितांवर कारवाई करण्यास महावितरण कर्मचारी मात्र टाळाटाळ करत आहेत.
वीज कायदा २००३ नुसार विजेचा वापर करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने स्वतंत्र मीटर बसविणे आवश्यक आहे. ज्या कारणासाठी वीज घेतली त्याच कारणासाठी वापर करणे बंधनकारक आहे. शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी कायद्यातील कलम १२६ नुसार गुन्हा ठरतो. संबंधितांवर दंडात्मक कारवाई व गुन्हाही दाखल करता येतो. महावितरण कर्मचारी सर्वसामान्य ग्राहकांवर अशा प्रकारची कारवाई करत असतात. परंतु नवी मुंबईमध्ये पोलीस अनेक वर्षांपासून वीज कायदा धाब्यावर बसवून विजेचा गैरवापर करत आहेत. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. वाशीमध्ये महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलीस चौकी आहे. पूर्वी येथे एकच चौकी होती. आता कर्मचाऱ्यांसाठी एक, अधिकाऱ्यांसाठी एक व दंड वसुलीसाठी एक केबिन तयार केली आहे. तिन्ही ठिकाणी मीटर न घेता विजेचा वापर सुरू आहे. उड्डाणपुलावरील होर्डिंगसाठी वीजमीटर घेण्यात आले आहे. संबंधितांकडून पोलीस चौकीसाठी अनधिकृतपणे वीज घेण्यात आली आहे. नियमाप्रमाणे हा गुन्हा असून त्याकडे महावितरण कर्मचारी कारवाई करत आहेत.
वाहतूक पोलीस किरकोळ कारणांसाठीही वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करतात. स्वत: हेल्मेट न घालता सामान्य दुचाकीस्वारांवर हेल्मेट घातले नसल्याबद्दल कारवाई करतात. स्वत: सिग्नलचे पालन करत नाहीत. ज्यांच्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे त्यांना अभय देऊन सामान्य वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास मनाई असताना पोलीस कारवाई केलेली वाहने या ठिकाणी उभी करत असून आता विजेचाही गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे महावितरणचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता व वाशी, नेरूळ, पनवेल विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाजवळच पोलीस विजेचा गैरवापर करत असताना अधिकारी काहीच कारवाई करत नाहीत. यामुळे या गैरप्रकारास महावितरणचाही आशीर्वाद आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कार्यकारी अभियंता एस. डी. सुरवले व अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांच्याशी वारंवार संपर्क साधला परंतु होऊ शकला नाही.
कलम १२६ चे उल्लंघन
च्वीज कायदा कलम १२६ प्रमाणे शेजाऱ्याकडून वीज घेणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे विजेचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक व इतर कारवाई केली जाते.
च्वाशीसह नवी मुंबईमधील अनेक पोलीस चौक्यांमध्ये हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे. मीटर न घेता शेजाऱ्यांकडून वीज घेण्यात आली असून याकडे महावितरणचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत.