Join us

१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचे टप्पे करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 06:18 IST

गर्दी कमी करण्यासाठी नवीन पद्धत आणणार; वय, सहव्याधीप्रमाणे वर्गीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारा  गोंधळ लक्षात घेता, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देताना वय, सहव्याधीनुसार  टप्पे करण्याचा विचार सार्वजनिक आरोग्य विभाग करीत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली.

३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला वर्गीकरण करावे लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक  लस मागवण्यासंदर्भात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडशी (आरडीआयएफ) चर्चा सुरू आहे. जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. 

आरोग्य विभागातील १६ हजार कर्मचाऱ्यांची लवकरच भरती करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय निविदेच्या माध्यमातून ३ लाख रेमडेसिविर लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

३८ पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होणार३ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात ३८ पीएसए प्लांट लवकरच कार्यान्वित होतील, असे टोपे म्हणाले

तिसरी लाट लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्सकोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यात बालकांना संसर्ग होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स तातडीने तयार करण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयुमधील बेड यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला.

टॅग्स :मुंबईराजेश टोपे