'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण
By संतोष आंधळे | Updated: October 16, 2023 21:05 IST2023-10-16T20:53:17+5:302023-10-16T21:05:59+5:30
९ हजार ४९३ श्वान आणि ४ हजार ६९८ मांजरांचा समावेश

'रेबिजमुक्त मुंबई' मोहीम अंतर्गत १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील भटक्या प्राण्यांचे लसीकरण तसेच ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत महानगरपालिकेच्या ६ प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या दाट लोकवस्तीच्या परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात ९ हजार ४९३ भटके श्वान आणि ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचा समावेश आहे.‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.
कशी राबविली मोहीम
दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण १५ पथके तैनात करण्यात आली होती. त्यात हाताने प्राणी पकडणाऱ्या १० पथकांचा तर जाळीने प्राणी पकडणाऱ्या ५ पथकांचा अंतर्भाव होता. या प्रत्येक पथकात एक लसटोचक, एक माहिती संकलक आणि पशू कल्याण संस्थेचा एक प्राणी हाताळणीस स्वयंसेवक यांचा समावेश होता.
आर उत्तर , आर मध्य, आर दक्षिण, पी उत्तर, एस आणि टी या सहा विभागांचा समावेश आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ९ हजार ४९३ भटक्या श्वानांचे व ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचे असे एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.