Join us  

कांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 8:05 AM

पालिकेच्या चौकशीत निष्पन्न; युजर आयडी, पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्र

मुंबई : कांदिवली येथील गृहनिर्माण सोसायटीतील लसीकरण बनावटच असल्याचे महापालिकेच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर लसीकरणाची प्रमाणपत्रे देण्यासाठी यूजर आयडी व पासवर्ड चोरून बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आणि संशयित लससाठा अनधिकृत पद्धतीने मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.

कांदिवली (पश्चिम), हिरानंदानी हेरिटेज क्लब येथे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस ३० मे रोजी देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी १,२६० रुपयांप्रमाणे चार लाख ५६ हजार रुपये रहिवाशांनी दिले. मात्र, लसीकरण करणाऱ्या चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आली. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली.

असे काही प्रकार आणखी काही ठिकाणी घडले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपआयुक्त (परिमंडळ ७) विश्वास शंकरवार यांच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यांनी शनिवारी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केलेल्या अहवालानुसार संपूर्ण लसीकरण बनावटरित्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करताच संशयितांनी लसीकरण केले.

रुग्णालयांचा लसीकरणाशी संबंध नाही

लस देण्यात आलेल्या ३९० पैकी प्रत्यक्ष १२० रहिवाशांनाच लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. तीन विविध रुग्णालयांची नावे या प्रमाणपत्रांवर होती. मात्र संबंधितांनी या रुग्णालयांशी करारनामा केलेला नाही. या रुग्णालयांचा त्या लसीकरणाशी कोणताही संबंध नाही, असे चौकशीत उघड झाले.

केंद्राकडून आलेल्या साठ्यातील या लसी नाहीत!

केंद्राकडून मुंबई पालिकेला आलेल्या लसींच्या साठ्यापैकी या लस नसल्याचे समोर आले. याबाबत पालिकेकडून अधिक चाैकशी सुरू आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका