Join us  

लसीकरण... लांबलचक रांगेत उभारलीय जनता अन् गोतावळ्यासह थेट दालनात भाजपा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 11:13 AM

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे.

ठळक मुद्देभाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी पालिका आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात भाजपाचे नगरसेवक रोहिदास पाटील यांनी त्यांच्यासह अन्य काहीजणांचे लसीकरण थेट पदाचा गैरवापर करत दबावाखाली तेथील डॉक्टरांच्या दालनात करून घेतल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे.

मीरारोड - शहरात गेल्या ३ दिवस लसीकरण बंद असल्याने गुरुवारी लसीकरणासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी ६ पासून रांग लावलेल्या व उन्हातान्हात तासन तास लसीकरणासाठी रांगेत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे हाल एकीकडे होत होते. तर, दुसरीकडे भाजपा नगरसेवकाने आपल्या गोतावळ्यासह पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरच्या दालनात पदाचा गैरवापर करत लसीकरण करून घेतल्याचा संतापजनक प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे. परंतु लसीकरण केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात असल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. लसीकरण केंद्रात सुद्धा राजकीय चमकोगिरी करण्यासाठी तसेच स्वतःच्या मर्जीतील लोकांचे लसीकरण करून देण्यासाठी कोरोना संकट काळात सुद्धा उपदव्याप सुरू असल्याने नागरिक संतापले आहेतच. याशिवाय लसीकरण केंद्रावरील कर्मचारी वर्ग व पोलीस सुद्धा त्रासले आहेत. 

त्यातच भाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी पालिका आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात भाजपाचे नगरसेवक रोहिदास पाटील यांनी त्यांच्यासह अन्य काहीजणांचे लसीकरण थेट पदाचा गैरवापर करत दबावाखाली तेथील डॉक्टरांच्या दालनात करून घेतल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवार पासून पालिकेची बहुतांश लसीकरण केंद्र बंद होती. बुधवारी लस मिळाल्याने आज गुरुवारी ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण केंद्र पुन्हा सुरु झाली. तीन दिवस लसीकरण बंद असल्याने गुरुवारी बंदरवाडी लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांग लावली होती. कडक उन्हात लोक तासन तास लस मिळावी म्हणून हाल सहन करत उभे होते. एकीकडे सामान्य नागरिकांचे हाल चालले असताना दुसरीकडे आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागचे डॉ. संदीप प्रधान यांच्या दालनात मात्र भाजपचे नगरसेवक रोहिदास पाटील हे पत्नी व अन्य निकटवर्तीय तसेच भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष श्रीपत मोरे आदींसह लसीकरण करून घेत होते. तर बाहेर तपासणीसाठी बाह्यरुग्ण रांग लावून होते. 

लोकमतच्या प्रतिनिधीस याची माहिती मिळताच डॉ. प्रधान यांच्या तपासणी केबिन बाहेर रांगेत असलेल्या नागरिकांकडे विचारणा केली असता त्यांनी लसीकरण नव्हे तर तपासणीसाठी रंग असल्याचे सांगितले. नंतर लोकमतचे प्रतिनिधी डॉ. प्रधान यांच्या दालनात गेले असता तेथे नगरसेवक रोहिदास पाटील यांच्या पत्नी कोविशील्डची लस घेत होत्या तर नगरसेवक पाटील हे तेथेच बसले होते. डॉक्टर प्रधानसह लसीकरण प्रमुख डॉ. अंजली पाटील सुद्धा तेथेच उपस्थित होत्या. त्यानंतर नगरसेवकाच्या आणखी एक परिचितास लस देण्यात आली. 

नंतर माजी भाजपा मंडळ अध्यक्ष श्रीपत मोरे हे लस घेण्यासाठी आत आले. लोकमतच्या प्रतिनिधीने डॉ. अंजली पाटील यांच्याकडे ह्या गंभीर प्रकाराबाबत थेट विचारणा केल्यावर नगरसेवक तेथून निघून गेले. तर उपस्थित डॉक्टर आदींची चलबिचल सुरु झाली. डॉक्टरांच्या टेबलावर कोविशील्डच्या लसीची बाटली आदी ठेवलेले होते. डॉ. पाटील यांनी डॉ. प्रधान यांना येथे लसीकरण कसे सुरु केले ? असा जाबसुद्धा विचारला. एकीकडे सामान्य नागरिक लसीकरणासाठी वणवण करून तासन तास हाल सहन करत असताना भाजपा नगरसेवक मात्र आपल्या गोतावळ्याचं डॉक्टरांच्या दालनात खास बडदास्त राखत लसीकरण करून घेत आहे. या प्रकारामुळे भाजपा नेत्यावर टीकेची झोड उठण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :कोरोनाची लसमुंबईभाजपामीरा रोड