चौकच्या ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त
By Admin | Updated: August 10, 2014 23:23 IST2014-08-10T23:22:36+5:302014-08-10T23:23:40+5:30
मुंबई - पुणे महामार्गावर महत्वाचे समजले जाणारे चौक ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षापासून काही पदे रिक्त आहेत.

चौकच्या ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त
चौक : मुंबई - पुणे महामार्गावर महत्वाचे समजले जाणारे चौक ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षापासून काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे २० गावे ७ आदिवासी वाड्यातील गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. सदर रुग्णालय ३० खाटांचे असून येथे आरोग्य सेवा सुविधांचा मोठ्याप्रमाणात अभाव आहे.
या रुग्णालयात सध्या एकच वैद्यकीय अधिकारी असून ते पनवेलहून येतात. रात्री अपरात्री अनेक वेळा येथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांचे उपचारासाठी हाल होतात. डॉक्टर अभावी वेळीच उपचार होत नसल्याने पनवेल, अलिबाग, वाशी येथे हलवावे लागते. खाजगी वैद्यकीय सेवा सर्व रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे चौकचे ग्रामीण रुग्णालय असून नसल्यासारखे आहे.
चौक ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येतात. यापूर्वी दोन डॉक्टर राजीनामा देऊन गेले असल्याचे समजते. त्या जागा रिक्त ओहत. त्या भरणेबाबत आरोग्य खात्याने कार्यवाही करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संस्था चौकने आमसभेत केली आहे.
शासनाच्या दुर्लक्षतेमुळे रिक्त पदे भरण्याची सवड सुध्दा शासनाला भासत नाही. याबाबतचे जनआंदोलन जनतेने छेडल्यास त्यांची जबाबदारी निष्क्रिय प्रशासनावर राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया मोरवे धरणग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष अंकुश वाघ यांनी व्यक्त केली. या रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबद्दल बोलताना वाघ म्हणाले की, शासनाने दखल घेऊन कारभारात सुधारणा करावी.