मुंबई : मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील चार वैद्यकीय महाविद्यालये व नायर दंत महाविद्यालयात प्राध्यापक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ५८७ जागा रिक्त आहेत. ही रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले. एमपीएससीमार्फत ही पदे भरली जात नाहीत तोपर्यंत ३४७ पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
काँग्रेस आ. भाई जगताप यांनी रिक्त प्राध्यापक पदांबाबत तारांकित प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने उत्तर देताना सामनंत म्हणाले, नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम दर तीन महिन्यांनी बदलतात. हे नियम शासनाच्या नियमात समाविष्ट करण्यासाठी पुन्हा तीन महिने लागतात. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यास उशीर होत आहे.
नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम बदलतील, त्याचवेळी शासनाचे नियम बदलण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील. त्यासाठी विधेयक आणावे लागले तरी चालेल. त्याचा पाठपुरावा करू, असे पालिका प्रशासनाला सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयातही प्रतिनियुक्तीऐवजी थेट नियुक्ती करण्यात यावी, या मागणीवर मंत्री सामंत यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी उचित कारवाई केली जाईल.