'उत्साह'मध्ये कौशिकी चक्रबर्तींसह आघाडीच्या कलाकारांची जुगलबंदी
By संजय घावरे | Updated: January 24, 2024 19:23 IST2024-01-24T19:23:01+5:302024-01-24T19:23:16+5:30
नेहरू सेंटरमध्ये वार्षिक संगीत मैफिलीचे आयोजन.

'उत्साह'मध्ये कौशिकी चक्रबर्तींसह आघाडीच्या कलाकारांची जुगलबंदी
मुंबई - पुर्बयान आर्ट्स, आर्टीस्ट अँड म्युझिक फाऊंडेशन (पीएएएमएफ) या संस्थेच्या वतीने ‘उत्साह - एम्पॉवर, एन्लायटन, एन्टरटेन्मेंट’ या वार्षिक संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रबर्ती यांच्यासह दिग्गज कलाकारांची जुगलबंदी रंगणार आहे.
वरळी येथील नेहरू सेंटर येथे ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता 'उत्साह'चे आयोजन करण्यात आले आहे. या सांगीतिक मैफिलीत संगीत आणि कला क्षेत्रातील काही दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. गायिका कौशिकी चक्रबर्ती यांना तबल्यावर ओजस अधिया, सारंगीवर मुराद अली आणि हार्मोनियमवर अजय जोगळेकर साथ देणार आहेत. ‘क्लासिकुल’बरोबर आघाडीचे सितारवादक पुर्बयान चॅटर्जी या मैफिलीचा समारोप करणार आहेत. यावेळी पीएएएमएफमधील विद्यार्थ्यांबरोबर एक विशेष सत्र सादर होणार आहे. फाऊंडेशनमधील काही होतकरू, प्रतिभावान आणि गुणी विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक व्यासपीठ प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएएएमएफच्या वतीने अशा मैफिलींचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांच्या सहवासात आपली कला सादर करण्याची संधी मिळते. यंदा कौशिकी चक्रबर्ती त्यांचे गायन सादर झाल्यावर पीएएएमएफच्या मुलांबरोबर एक-दोन गाणीही सादर करणार आहेत. पीएएएमएफ ही सितारवादक पुर्बयान चॅटर्जी आणि गायिका गायत्री अशोकन यांनी सुरु केलेली संस्था असून, याद्वारे भारतातील तरुण संगीतकारांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी व संगीताच्या प्रसारासाठी मदतीचा हात दिला जातो.