प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांनो सावधान!
By Admin | Updated: January 9, 2015 22:42 IST2015-01-09T22:42:14+5:302015-01-09T22:42:14+5:30
शहरात ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याबाबत पालिका प्रशासनाने १ जानेवारीपासून ठोस पावले उचलली आहेत.

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांनो सावधान!
पनवेल : शहरात ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याबाबत पालिका प्रशासनाने १ जानेवारीपासून ठोस पावले उचलली आहेत. याकरिता कडक निर्बंध घालण्यात आले असून त्यासंदर्भात दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुकानदारांकडे पिशव्यांचा साठा आढळल्यास त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
वाढत्या लोकसंख्येनुसार पनवेल शहरात दररोज किमान ४० टन कचऱ्याची निर्मिती होते, तर सिडको वसाहतीत सुमारे दीडशे टन कचरा बाहेर पडत असल्याची नोंद आहे. या दोन्ही ठिकाणच्या कचऱ्यात साधारणपणे ७५ टन कचरा हा प्लास्टिक नाहीतर कॅरिबॅगचा असल्याचे आढळून येत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. त्यामुळे कायद्यानेच बंदी असलेल्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशवीवर सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकारी आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देऊन शहरात व वसाहतीत बंदी घातलेली आहे. आरोग्य निरीक्षकांनीही कारवाई प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु पालिका आणि सिडको प्राधिकरणाच्या हद्दीत ही कारवाई थंडावल्यामुळे दररोजच्या कचऱ्यात पुन्हा प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे.
सध्या देशभर महात्मा गांधी स्वच्छता अभियान सुरू असून घराघरापर्यंत स्वच्छता पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पावले उचलली असून जो कोणी प्लास्टिकच्या पिशव्या बाळगेल, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून कळविण्यात आले. त्या अनुषंगाने एक हजार दुकानदारांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावून त्याचबरोबर घरोघरी माहिती पत्रके देवून जनजागृती करण्यात आली आहे.
प्लास्टिकचा वापर खपवून न घेण्याची भूमिका मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी घेतली आहे. विशेष स्वच्छता मोहिमेनंतर आरोग्य अधिकारी दिलीप कदम, दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, अंबोलकर या अधिकाऱ्यांसह संपूर्ण आरोग्य विभाग प्लास्टिक निर्मूलनाच्या कामाला लागला आहे. (वार्ताहर)
नाले प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प
२५ जुलै २००५ साली मुंबईसह पनवेल परिसरात मोठा प्रलय आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली. महापुराच्या कारणाचा शोध घेताना प्लास्टिक हे महत्त्वाचे कारण पुढे आले. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार केलेल्या नाले आणि गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या अडकल्याने पाणी एकाच जागेवर तुंबले.