हळद लागवडीचा आदिवासींचा प्रयोग
By Admin | Updated: January 22, 2015 23:04 IST2015-01-22T23:04:17+5:302015-01-22T23:04:17+5:30
जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यांतील दारिद्र्यरेषेखालील १० लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर यशस्वी हळद लागवड करून देण्यात आलेली आहे.

हळद लागवडीचा आदिवासींचा प्रयोग
जव्हार : येथील महाराष्ट्र कला तसेच शिक्षण विकास संस्थेच्या मार्फत जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यांतील दारिद्र्यरेषेखालील १० लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर यशस्वी हळद लागवड करून देण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
अनुसूचित जमातीच्या या लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून विशेष केंद्रीय साहाय्य योजनेंतर्गत हळद लागवडीसाठी या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार, लाभार्थ्यांच्या शेतात नांगरणी करून सेलम जातीचे उत्तम प्रतीचे कंद वापरून ठिबक सिंचनद्वारे सऱ्या पाडून लागवड केल्याने येथे यापूर्वी कधीही न उगवलेल्या हळदीचे उत्तम पीक आले. यामुळे शेतकरी आनंदात आहेत. हा कंद पिकल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात त्याची चांगल्या दराने विक्री होईल. या यशस्वी प्रयोगामुळे आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमित शेतीसोबतच हळद लागवडीतूनही चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे महाराष्ट्र कला आणि शिक्षण विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
हळद ही आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. अन्य रुपातही हळदीचा वापर नित्याचाच असतो. विविध धार्मिक कार्यांतही तिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तिचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. जगातील तिच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. याची लागवड तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात काही मोठ्या प्रमाणावर ठिकाणी करण्यात येते.
हळद हे फायदेशीर पीक आहे. याचाच फायदा येथील गरीब, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना व्हायला हवा. त्यांच्यासाठी हळद लागवड ही कमी खर्चात आणि शाश्वत
उत्पन्न देऊन जाणारी किमया नव्हे तर वरदानच ठरणार आहे, असे सहा. प्रकल्प अधिकारी (विकास) प्रदीप देसाई यांनी सांगितले.
या शेतकऱ्यांची हळद भारतातीलच नव्हे तर परदेशांतील शहरांमध्ये पोहोचेल. पर्यायाने त्यांना कमी खर्चातील जास्त उत्पन्न मिळाल्यास त्यांची आर्थिक प्रगती होऊन राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे.
- अभिमन्यू मगर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदि. विकास प्रकल्प, जव्हार
आम्हाला या हळद लागवड
योजनेतून चांगला फायदा होणार आहे. संस्थेने दिलेल्या मार्गदर्शनामुळे
आणि शासनाच्या या योजनेमुळे आमच्या कुटंबाला मोठा हातभार लागले.
- ऊर्मिला बबन हारणे,
लाभार्थी, डोगस्ता, ता. वाडा