आरक्षणाचा वापर समाजासाठी करा
By Admin | Updated: September 20, 2014 00:36 IST2014-09-19T23:04:20+5:302014-09-20T00:36:21+5:30
नारायण राणे : कुडाळ येथील कृतज्ञता सोहळ्यात प्रतिपादन

आरक्षणाचा वापर समाजासाठी करा
कुडाळ : आपापसातील वादविवाद मिटवून यापुढे एका विचाराने समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र या व मिळालेल्या आरक्षणाचा वापर समाजातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठा समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ येथील मराठा समाजाच्या कृतज्ञता सोहळ्यात केले.
मराठ्यात रग असली पाहिजे. जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवबासारखे, असा सल्ला दिला. मनगटातील ताकदीचा प्रगतीसाठी वापर करा. आपापसातील तंटेवाद मिटवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहा, असेही सांगितले.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांचा सत्कार तसेच कृतज्ञता सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा आरक्षण उत्कर्ष समितीच्यावतीने कुडाळ येथील प. पू. श्री वासुदेवानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नीलम राणे, कार्यक्रमाध्यक्ष राजमाता सत्वशिलादेवी भोसले, नीतेश राणे, कोल्हापूर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. वसंत मुळीक, प्रवीण भोसले, सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मराठा आरक्षण उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, अशोक सावंत, विकास सावंत, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, डॉ. य. बा. दळवी, प्रा. जी. एस. सावंत, उपसभापती आर. के. सावंत, दादा साईल, प्रकाश मोर्ये, नीता राणे, विशाल परब, शेखर सावंत, सुंदर सावंत, इंद्रजीत सावंत तसेच समितीचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
मराठे आपापसात वादविवाद करीत राहतात. मात्र, विकासासाठी कधीही एकत्र येत नाहीत, अशी खंत राणे यांनी व्यक्त केली. उद्योगधंद्यात मराठा समाज अर्धा टक्काही नाही. आजची तुमची एकजूट काळाची तसेच भविष्यातील तरुण पिढीच्या उद्धारासाठी अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे एकत्रित या, असे आवाहन राणेंनी केले. राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते राणे यांचा मराठा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच राणेंच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून सर्व तालुकाध्यक्षांकडे पेटत्या मशाली समाजाच्या जनजागृतीसाठी सोपविण्यात आल्या. मराठा महासंघ कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मुळीक म्हणाले की, कोल्हापूरकर कोणाला उगाचच मोठे बनवत नाहीत. मात्र, आरक्षण देणाऱ्या राणे यांना कोल्हापूरवासीयांनी ३ आॅगस्ट रोजी भव्य सत्कार प्रसंगी जयघोष केला. प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, सूत्रसंचालन जयंद्रथ परब, आभार शाम परब यांनी मानले. या कार्यक्रमाअगोदर कोल्हापूर कागल येथील सदाशिवराव निकम यांनी पोवाडे सादर केले. प्रा. अरुण मर्गज यांनी दिग्दर्शन केलेल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. (प्रतिनिधी)
पाय ओढण्याची वृत्ती टाळा : सत्वशिलादेवी भोसले
यावेळी बोलताना राजमाता सत्वशिलादेवी भोसले म्हणाल्या, बहुजन समाजाच्या विकासासाठी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य नेत्यांनी योगदान दिले. त्याचप्रमाणे आपल्या कारकिर्दीत राजमहाल न बांधता बापूसाहेबांनी शैक्षणिक विकासासाठी कार्य केले. त्याचप्रमाणे आज मिळालेल्या आरक्षणामुळे समाजाचा शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी निश्चित उपयोग होईल. मराठा समाजाने दुसऱ्याचे ऐकून आपल्याच माणसाचे पाय ओढण्याची वृत्ती टाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षपद अजित पवारांनी सुचविले : राणे
जर का मराठा समाजाला आरक्षण घ्यायचे असेल, तर त्या आरक्षण समितीचे अध्यक्षपद नारायण राणे यांनाच द्या. तरच हे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, असे वक्त व्य त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले होते, असेही राणेंनी सांगितले. तेव्हाच्या मराठ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केले. आताचे मराठे कोणी सरपंच, नगरसेवक, आमदार होण्यासाठी भांडत आहेत. हे भांडत बसण्यापेक्षा हातात लेखणी घ्या, अभ्यास करा, मुलांना उच्च शिक्षण द्या, असा सल्ला राणेंनी यावेळी समाज बांधवांना दिला.