तलावांचा वापर संक्रमण शिबिरासाठी
By Admin | Updated: September 27, 2014 06:07 IST2014-09-27T06:07:53+5:302014-09-27T06:07:53+5:30
नैसर्गिक तलाव बुजविण्यास न्यायालयाची बंदी असतानाही ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील तलावांचा उपयोग संक्रमण शिबिरासाठी करण्याचा ठराव केला आहे

तलावांचा वापर संक्रमण शिबिरासाठी
ठाणे : नैसर्गिक तलाव बुजविण्यास न्यायालयाची बंदी असतानाही ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील तलावांचा उपयोग संक्रमण शिबिरासाठी करण्याचा ठराव केला आहे. हा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाण्यातील दक्ष नागरिक नितीन देशपांडे यांनी केला आहे. तसेच तो रद्द करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या संमत विकास आराखड्यात सेक्टर ९ मौजे मुंब्रा येथे टँक/तलाव दर्शविला आहे. या जागेसंबंधी समतल हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा संक्रमण शिबिरासाठी उपयोग करण्याचा ठराव महापालिकेने केला आहे. मात्र, तलावाची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना आणि न्यायालयाची बंदी असताना हा ठराव करण्यात आल्याचेही निवेदनात मांडले आहे.
तलावांसंबंधी बेकायदेशीर ठराव आणणाऱ्या प्रशासनावर तसेच लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)