मेंदूवर उपचारासाठी ‘ग्लू’चा वापर; मुंबईतील ५३ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूवर यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:07 IST2021-04-23T04:07:31+5:302021-04-23T04:07:31+5:30
मुंबई : पक्षघाताचा झटका (ब्रेन स्ट्रोक) आलेल्या एका ५३ वर्षीय रुग्णाच्या मेंदूमध्ये ग्लूचा वापर करून उपचार करण्यात आले आहे. ...

मेंदूवर उपचारासाठी ‘ग्लू’चा वापर; मुंबईतील ५३ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूवर यशस्वी उपचार
मुंबई : पक्षघाताचा झटका (ब्रेन स्ट्रोक) आलेल्या एका ५३ वर्षीय रुग्णाच्या मेंदूमध्ये ग्लूचा वापर करून उपचार करण्यात आले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. इंटरवेनशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित सोनी आणि डॉ. अशंक बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया टाके न लावता करण्यात आल्याने रुग्णाच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा दिसून आली.
वरळी येथील रहिवासी अंबादास पुंडे यांना सलग दोन वेळा मेंदूचा (पक्षघात) सौम्य झटका आला होता. यामुळे कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केले. यानंतर चाचणी अहवालात त्यांना ब्रेन एन्युरिजम हा आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे मेंदूच्या आजूबाजूच्या जागेत मोठी इजा होऊन जिवाला धोकादेखील संभवू शकतो.
याबद्दल डॉ. हमदुल्ले यांनी सांगितले की, रुग्णाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वेळीच न्यूरोसर्जरी न केल्यास मेंदूला धोका पोहचू शकतो. या अनुषंगाने नवीन उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णावर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
डॉ. अशंक बन्सल यांनी सांगितले की, ब्रेन एन्यूरिजम या आजारावर मेंदूमध्ये ग्लूचा वापर करणे हा सुरक्षित पर्याय आहे. मेंदूच्या भागात १ मिमीपेक्षा लहान छिद्र करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यात ग्लू एका इंजेक्शनने लावला जातो. ही शस्त्रक्रिया मेंदूला कमीतकमी नुकसान पोहोचवून केली जाते. तसेच या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते.