खाद्यपदार्थांमध्ये दूषित पाण्याचा वापर
By Admin | Updated: July 5, 2015 03:29 IST2015-07-05T03:29:23+5:302015-07-05T03:29:23+5:30
उघड्यावर अन्न शिजवून त्याची विक्री करणारे फेरीवाले दूषित पाणी वापरत आहेत़ अनेक ठिकाणी वापरण्यात आलेल्या पाण्यामध्ये ई कोलाय सापडल्यामुळे पालिकेने

खाद्यपदार्थांमध्ये दूषित पाण्याचा वापर
मुंबई : उघड्यावर अन्न शिजवून त्याची विक्री करणारे फेरीवाले दूषित पाणी वापरत आहेत़ अनेक ठिकाणी वापरण्यात आलेल्या पाण्यामध्ये ई कोलाय सापडल्यामुळे पालिकेने रस्त्यांवरील फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे़ या अंतर्गत गेल्या महिन्याभरात रेल्वे परिसरात तब्बल १५ हजार फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे़ तसेच १५०० हातगाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत़
पालिकेने ५२० पैकी ९१ ठिकाणांहून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय हा जीवाणू आढळून आला आहे़ यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळसारखे जलजन्य आजार पसरण्याचा धोका असल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ पावसाळ्यात जलजन्य आजारांचा फैलाव टाळण्यासाठी विशेष मोहीम घेण्याची आयुक्त अजय मेहता यांनी आरोग्य खात्याला ताकीद दिली होती़ त्यानुसार विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ व पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे़
या मोहिमेंतर्गत पालिकेने रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना लक्ष्य केले आहे़ मुख्यतो रेल्वे स्थानकाबाहेरील खाद्यपदार्थांवर चाकरमानी ताव मारतात़ त्यामुळे पालिकेने गेल्या काही दिवसांपासून सीएसटी आणि चर्चगेट रेल्वे व सबवे परिसर, दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, बोरीवली, अंधेरी, कांजूरमार्ग, विक्रोळी, चर्नी रोड, रे रोड या परिसरातून १४ हजार फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे़ यामध्ये चर्चगेट व सीएसटी परिसरातील फेरीवाल्यांचा सर्वाधिक समावेश आहे़ (प्रतिनिधी)