अटल सेतूवर आपत्कालीन व्यवस्थेची तातडीची गरज, आमदार मिलिंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 8, 2026 12:29 IST2026-02-08T12:27:53+5:302026-02-08T12:29:45+5:30
Atal Setu News: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ नुकत्याच झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल ३६ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे हजारो प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अटल सेतूवर आपत्कालीन व्यवस्थेची तातडीची गरज, आमदार मिलिंद नार्वेकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ नुकत्याच झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल ३६ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे हजारो प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा सेतू (अटल सेतू) वर तातडीने सक्षम आपत्कालीन व्यवस्थेची उभारणी करण्याची मागणी केली आहे. नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, अटल सेतू हा मुंबई व नवी मुंबईला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून दररोज हजारो वाहने या सेतूवरून प्रवास करतात. भविष्यात येथे कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास, समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रभावी बचाव यंत्रणा उपलब्ध नसल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर अपघाताचा संदर्भ देत त्यांनी इशारा दिला आहे की, अशीच घटना अटल सेतूवर घडल्यास प्रशासनासह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपत्कालीन बचाव सेवा वेळेत पोहोचेल यासाठी सुसज्ज आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, हेलिपॅड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गंभीर आपत्तीच्या वेळी हेलिकॉप्टरद्वारे रुग्ण व प्रवाशांची त्वरित सुटका होण्यासाठी सेतूवर हेलिपॅडची सुविधा अत्यावश्यक असल्याचेही नार्वेकर यांनी अधोरेखित केले आहे. अशा उपाययोजनांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.अपघातांच्या वेळी तत्काळ व प्रभावी प्रतिसादाची गरज सामान्य नागरिकांपासून प्रशासनापर्यंत सर्व स्तरांवरून व्यक्त होत असून, आता याबाबत मुख्यमंत्री आणि शासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.