उमाकांत देशपांडे
मुंबई : आखातातील युद्धामुळे कतारहून होणारा सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे राज्यासह देशभरातील वीजनिर्मिती प्रकल्पांना फटका बसला आहे. महानिर्मिती कंपनीच्या उरण प्रकल्पातील वीजनिर्मिती निम्म्यावर आली असून, सीएनजी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांसाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्याने चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आखाती युद्धामध्ये अमेरिका व इस्त्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू असून, इराणकडूनही प्रत्युत्तर म्हणून शेजारील देशांच्या तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांच्या केंद्रांवर हल्ले करण्यात आले. कतारच्या पार्स आणि लफानवर हल्ले झाल्याने तेथून भारताला होणाऱ्या सीएनजी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे.
देशाला ४० टक्क्यांहून अधिक सीएनजी पुरवठा कतार, तर उर्वरित गॅसपुरवठा अमेरिका, यूएई व अन्य देशांकडून होतो. कतारहून गॅसपुरवठा होत नसल्याने राज्यातील उरण येथील गॅस आधारित वीजनिर्मिती केंद्राला पुरेसा गॅस उपलब्ध होत नाही. त्यामुळे या केंद्राच्या वीजनिर्मिती क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे.
गॅसअभावी या केंद्रांना बसला फटका
सीएनजी उपलब्ध नसल्याने एनटीपीसीच्या गुजरातमधील गंधार, कावस येथील प्रकल्पांमधील वीजनिर्मिती थंडावली आहे. आंध प्रदेशातील सुमारे सहा हजार मेगावॉट खासगी वीजनिर्मिती केंद्रांनाही मोठा फटका बसला आहे.
या वीजनिर्मिती प्रकल्पातून ८०० मेगावॉटऐवजी निम्मीच वीजनिर्मिती होत असून, आज सुमारे ३८७ मेगावॉट वीज निर्मिती झाली. उरण केंद्राला केंद्र सरकारकडून सवलतीचा गॅस उपलब्ध होत असल्याने येथील वीज तुलनेने स्वस्त म्हणजे प्रति युनिट ३.५० ते ४ रुपये दराने मिळते.
बाजारभावाने गॅस घेतल्यास वीज महाग
बाजारभावाने सीएनजी खरेदी केल्यास प्रकल्पातून मिळणारी वीज प्रति युनिट १२ रुपयांपर्यंत उपलब्ध होते आणि ती अतिशय महागडी ठरते. त्यामुळे वितरण कंपन्या ती वीज खरेदी करण्यास तयार नसतात. केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध झाला, तरच वीजनिर्मिती परवडते. त्यामुळे सध्या वीजप्रकल्पासाठी बाजारभावाने सीएनजी खरेदी करण्याची कोणाचीही तयारी नाही. केंद्र सरकारने घरगुती ग्राहक व खते तयार करण्यासाठी गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले असून त्यानंतर वीजप्रकल्पांसाठी सवलतीचा गॅस उपलब्ध होत आहे.
कतार व अन्य देशांमधून होणारा सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने उरणसह देशभरातील गॅस आधारित वीजप्रकल्पांची अडचण झाली आहे. हा गॅसपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ
गॅसअभावी उरणमधील वीजनिर्मिती कमी झाली असली, तरी महावितरणकडे अन्य स्त्रोतांमधून पुरेशी वीज उपलब्ध असल्याने ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण