उरण लोकल रखडली
By Admin | Updated: May 7, 2015 04:35 IST2015-05-07T04:35:32+5:302015-05-07T04:35:32+5:30
मुंबईला उरणशी लोकलमार्गाने जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नेरूळ-बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्पाची आतापर्यंत ३७२ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत.

उरण लोकल रखडली
मुंबई : मुंबईला उरणशी लोकलमार्गाने जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नेरूळ-बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्पाची आतापर्यंत ३७२ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. फक्त या २२ किलोमीटर रेल्वे प्रकल्पात तीन किलोमीटरची जमीन वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्याचे भूसंपादन करावे लागणार असल्याने लोकलने उरणला जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मध्य रेल्वे आणि सिडकोच्या सहकार्याने १९९६-९७ च्या आर्थिक वर्षात १ हजार ८0३ कोटी रुपयांचा प्रकल्प घोषित झाला. एक तृतीयांश मध्य रेल्वे आणि दोन तृतीयांश सिडकोच्या सहभागाने हा प्रकल्प सुरू आहे. यातील बेलापूर-सीवूड-उरण हा मूळ प्रकल्प ६0 किलोमीटरचा आहे. परंतु नेरूळ-बेलापूर-सीवूड हा २२ किलोमीटरचा जोडमार्ग तयार करण्यात आला आहे. यातील ३ किलोमीटरची जमीन ही वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्याचे भूसंपादन बाकी आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत ३७२ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या प्रकल्पात सीवूडनंतर नऊ नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात पाच आणि त्यानंतरच्या टप्प्यात चार स्थानके बांधण्यात येणार आहेत. यातील सीवूड स्थानकाची पुनर्बांधणी केली जात असून यामध्ये एक नवीन लाइनही टाकण्यात येईल. सीवूड स्थानकात रेल्वेच्या नवीन इमारतीचेही बांधकाम केले जात असून हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)