Join us  

आगीचा धूर बाहेर फेकण्यासाठी पालिका रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा; जीवितहानी टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 6:41 PM

बचाव कार्याला वेग मिळेल

मुंबई - रुग्णालयामध्ये आगीच्या घटना घडल्यास बऱ्यवेळा मदत पोहोचेपर्यंत धुरामुळे गुदमरुन रुग्णांचा मृत्यू होत असतो. मात्र आता आग लागल्यास वेगाने धूर बाहेर फेकणारी अद्ययावत यंत्रणा पालिका रुग्णालयात लवकरच बसविण्यात येणार आहे. परिणामी, धुरामुळे अडकून राहिलेल्या रुग्ण अथवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर पडण्याची वाट दिसू शकणार आहे. यामुळे जीवित-वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे. तर अग्निशमन दलाच्या बचावकार्यालाही वेग मिळणार आहे. 

पालिका रुग्णालयांमध्ये दररोज शेकडोच्या संख्येने रुग्ण येत असतात. सायन, केईएम आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयात तर दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. या रुग्णालयांच्या वैद्यकीय कक्षात, अतिदक्षता विभागात यांत्रिक व विद्युत प्रणाली कार्यरत आहे. या ठिकाणी आग लागल्यास रुग्णांसह नातेवाईक, डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. तसेच आग लागण्याची घटना घडल्यास रुग्ण व कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे धुरात गुदमरल्याने जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. 

भंडारा येथील आगीत गुदमरुन दहा बालकांचा मृत्यू झाला होता. अशी दुर्घटना मुंबईतील १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये टाळण्यासाठी बाह्यरुग्ण आणि अतिदक्षता विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी आग लागल्यास तेथील धूर शोधून बाहेर फेकणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेसाठी दोन कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने मंजुरीसाठी मंडल आहे. 

अशी आहे यंत्रणा-

आगीमुळे निर्माण झालेल्या धुरातून बाहेर पडण्याचा मार्गच अनेकवेळा सापडत नाही. त्यामुळे धुरात गुदमरून जीवितहानी वाढते. पालिका रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या नवीन यंत्रणेमुळे धूर बाहेर फेकल्यावर समोरचे स्पष्ट दिसू शकणार आहे. यामुळे घटनास्थळी अडकून पडलेल्या रुग्णांना बाहेर पडणे शक्य होईल. तर अग्निशमन दलालही बचावकार्य वेगाने करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :अग्निशमन दलमुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल