आगामी महापौर काँग्रेसचाच असणार
By Admin | Updated: July 7, 2015 00:22 IST2015-07-07T00:22:39+5:302015-07-07T00:22:39+5:30
केडीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती भक्कम ठेवा. महापौर बसविण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार रविवारच्या डोंबिवलीतील

आगामी महापौर काँग्रेसचाच असणार
डोंबिवली : केडीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती भक्कम ठेवा. महापौर बसविण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार रविवारच्या डोंबिवलीतील कार्यकर्ता-पदाधिकारी पक्ष मेळाव्यात करण्यात आला. काँग्रेस सरकारने ज्या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला, त्यातही युतीच्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, असा आरोप महापालिका प्रवक्ते संतोष केणे यांनी केला.
माणिक जगताप, मधू चव्हाण, पृथ्वीराज साठे, अशोक जाधव, प्रभारी संजय चौपाने आदी निरीक्षक मार्गदर्शनासाठी आले होते. तसेच बीएसयूपीच्या माध्यमातून बससेवा, पाणी, रस्ते आदी महत्त्वाची कामे काँग्रेस सरकारच्या कालावधीतच केली. महापालिकेत मात्र सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, ही शोकांतिका आहे.
सध्या शिक्षणमंत्र्यांचा पदवी घोटाळा, चिक्की घोटाळा अशी एकेक प्रकरणे बाहेर येत आहेत. या सरकारने नागरिकांची दिशाभूल केली असून आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याची नामी संधी आली आहे, ती दवडू नका, असे चव्हाण म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात काँग्रेसचे योगदान महत्त्वाचे आहे. अखंडता आणि एकताही पक्षामुळेच टिकली. संघटना महत्त्वाची असते. सोनिया गांधी यांनी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. जास्तीतजास्त संख्येने राजकारणात येऊन आपला ठसा उमटवावा, असे जगताप म्हणाले.
या वेळी प्रभारी संजय चौपाने, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, गटनेते सदाशिव शेलार यांनी महापालिकेच्या भ्रष्टाचारी कारभारावर टीकेची झोड उठवून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. या वेळी जिल्हाध्यक्षा लता जाधव, शारदा पाटील, सुप्रिया राणे, गीता चौधरी, शिवाजी शेलार, गंगाराम शेलार, नंदू म्हात्रे, पौर्णिमा राणे, राहुल, प्रणव केणे, पदाधिकारी उपस्थित होते.