शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे झाले अनावरण
By Admin | Updated: January 22, 2015 22:57 IST2015-01-22T22:57:21+5:302015-01-22T22:57:21+5:30
महानगरपालिकेच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण गुरुवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले.

शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे झाले अनावरण
महानगरपालिकेच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण गुरुवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, शिवसेना उपनेते अनंत तरे, महापौर संजय मोरे, सभागृह नेते नरेश म्हस्के उपस्थित होते. १९६७ सालची ठाणे नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने लढविली होती. तिच्या प्रचारसभेसाठी शिवसेनाप्रमुख आले असता त्यांच्या भाषणाच्या दरम्यान एका ठाणेकराने आम्हाला नाट्यगृह आणि स्टेडिअम द्या, अशी चिठ्ठी पाठविली.
ती वाचल्याबरोबर तुम्ही सत्ता द्या, असे आश्वासन त्यांनी दिले. ठाणेकरांनी त्यानुसार सत्ता दिली तेव्हा ही दोन्ही आश्वासने बाळासाहेबांनी पूर्ण करवून घेतली. गडकरी रंगायतनचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालेच शिवाय जेव्हा २५ वर्षांनी त्याची अवस्था खराब झाली तेव्हा त्याचे नूतनीकरण १९९९ मध्ये त्यांनी करवून घेतले. त्याचाही शुभारंभ त्यांच्याच हस्ते झाला. म्हणून त्यांचे तैलचित्र गडकरीत लावण्याबाबतचा ठराव २०१३ मध्ये महापालिकेने मंजूर केला होता. हे तैलचित्र कोल्हापूरचे चित्रकार जे.बी. सुतार यांच्याकडून काढून घेण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानुसार हा सोहळा शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येस घडून आला.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याबाबत पहिली घोषणा ठाण्यात झाली होती आणि पुढील वर्षापर्यंत भव्य स्मारक उभे राहील, अशी माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली असून कदाचित पुढील जयंतीला त्याच्या उद्घाटनाचाही योग येईल, असेही रावते म्हणाले. तर मुंबईतील स्मारकाबाबत समिती स्थापन झाली असून तेथे जागतिक कीर्तीचे स्मारक तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.