विद्यापीठात अभाविपचा ठिय्या
By Admin | Updated: June 18, 2016 01:27 IST2016-06-18T01:27:09+5:302016-06-18T01:27:09+5:30
मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमा, या प्रमुख मागणीसह अभाविपच्या

विद्यापीठात अभाविपचा ठिय्या
मुंबई : मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमा, या प्रमुख मागणीसह अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कलिना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनबाहेर दीड तास ठिय्या दिला.
विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरण आणि तेरावी प्रवेशपूर्व नोंदणीचे वारंवार बंद पडणारे संकेतस्थळ यामुळे अभाविपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे मुंबई मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. ओव्हाळ म्हणाले की, प्रवेशपूर्व नोंदणीला मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. अभाविपने केलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हजर नव्हते. त्यामुळे फोनवरून चर्चा करण्यात आली.कुलगुरूंनी पुढील आठवड्यात भेटण्याचे आणि अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे ओव्हाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
आंदोलनाला स्थगिती
संकेतस्थळाच्या सर्व्हरची शमता वाढवणे, पेपरफुटी प्रकरणी पोलिसांना योग्य ते सहकार्य करणे, विद्यापीठात आलेल्या नवीन आधिकाऱ्यांच्या कामकाजाचे अवलोकन करणे, अशा पद्धतीचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचा दावा अभाविपने केला आहे. मात्र पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर अंमलबजावणी होताना दिसली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.