Join us  

... तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By महेश गलांडे | Published: February 25, 2021 7:44 PM

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री बैठका घेऊन कारवाईसाठी योजना आखताना दिसत आहेत. अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी वाढलेल्या रुग्णांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त होती, तर सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अनेक जिल्ह्यांत 7 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तर, आरोग्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भावनिक साद, शाळा अन् कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पत्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना शाळा सुरु ठेवण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ''राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि. १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. 

राजेश टोपेंचं विद्यार्थ्याना पत्र 

शाळा अन् महाविद्यालये नुकतेच सुरु झाले असून कोरोना वाढताना दिसत आहे. तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय असूनही गेल्या वर्षभरापासून आपण घरीच बसून आहात. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, सर्वप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच, आई-वडिल, भाऊ-बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. बाहेरुन आल्यानंतर तोंड-हात पाय धुतले जातात का, मास्क वापरला जातो का, कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाते का, हे तुम्ही काळजीपूर्वक पाहा. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास संबंधित सदस्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात घेऊन जा. मित्रांनो, आजचा विद्यार्थी देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे, तरुणाचं मन सकारात्मक, बुद्धी सतेच आणि शरीर सदृढ पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तर, मग चला मला मदत करणार ना, मला तुमची खात्री आहे. आपण, ही लढाई नक्की जिंकू.... असे भावनिक आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यावर्षा गायकवाडशाळामुंबईजिल्हाधिकारी