सुवर्णपदक घेणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांचा प्रवेश अनियमित

By Admin | Updated: February 18, 2017 04:15 IST2017-02-18T04:15:49+5:302017-02-18T04:15:49+5:30

केंद्र सरकारने घेतलेल्या सीईटीमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तपशीलवार माहिती मुंबई युनिव्हर्सिटी

Unregistered entry of medical students taking gold medal | सुवर्णपदक घेणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांचा प्रवेश अनियमित

सुवर्णपदक घेणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांचा प्रवेश अनियमित

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या सीईटीमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तपशीलवार माहिती मुंबई युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्सला न दिल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेच्या सायन रुग्णालयाला त्यांच्या विसराळूपणाबद्दल चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू नका, असे म्हणत उच्च न्यायालयाने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाला संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा तर विद्यापीठाला या दोन्ही विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचे निर्देश दिले.
२०१२मध्ये एम्सद्वारे केंद्र सरकारच्या सीईटीमध्ये फिलारिया कुट्टी व प्रतीक पाटील अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. त्यांनी सायन रूग्णालयात एम. डी. पॅथॉलॉजी व एम. एस. आॅर्थोपॅडीमध्ये प्रवेश घेतला. मात्र महाविद्यालय या दोघांच्याही प्रवेशाची तपशीलवार माहिती विद्यापीठाला व मेडिकल कौन्सिलला देण्यास विसरले. त्यांच्या या विसराळूपणाचा फटका या दोन विद्यार्थ्यांना चांगलाच बसला. त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्याविरुद्ध या दोघांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या दोघांनाही गेली तीन वर्षे उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंतिम वर्षाला फिलारियाने पॅथॉलॉजीमध्ये सुवर्णपदक मिळवले. मात्र त्याला त्याची पदवी देण्यास व त्यांची नोंदणी करण्यास विद्यापीठाने व मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने नकार दिला. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली.
शुक्रवारच्या सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांनी सायन महाविद्यालयाला चांगलेच फैलावर घेतले. ‘गुणवत्ता यादीत प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची माहिती देण्यास महाविद्यालय विसरते, याचा अर्थ काय? जाणूनबुजून हे केले आहे, असा आम्हाला संशय येतोय. याची चौकशी करायची का? तुमच्या चुकीमुळ त्यांना तीन वर्षे नाहक त्रास भोगावा लागत आहे,’ अशा शब्दांत सायन महाविद्यालयाला सुनावले. (प्रतिनिधी)

फिलारिया कुट्टी, प्रतीक पाटील हे विद्यार्थी
२०१२मध्ये एम्सद्वारे केंद्र सरकारच्या सीईटीमध्ये फिलारिया कुट्टी व प्रतीक पाटील अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. या दोघांनीही केंद्र सरकारच्या कोट्यातून महापालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. पॅथॉलॉजी व एम. एस. आॅर्थोपॅडीमध्ये प्रवेश घेतला. मात्र महाविद्यालय या दोघांच्याही प्रवेशाची तपशीलवार माहिती विद्यापीठाला व मेडिकल कौन्सिलला देण्यास विसरले.

Web Title: Unregistered entry of medical students taking gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.