मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

By Admin | Updated: July 17, 2016 05:21 IST2016-07-17T05:21:31+5:302016-07-17T05:21:31+5:30

विमान प्राधिकरणाचे १०७ कोटी रुपयांचे दोन चेक बाउन्स झाल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमोटर विजय मल्ल्याविरुद्ध शनिवारी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

Unlawful Warrant issued against Mallya | मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : विमान प्राधिकरणाचे १०७ कोटी रुपयांचे दोन चेक बाउन्स झाल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमोटर विजय मल्ल्याविरुद्ध शनिवारी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. भारतीय न्यायालयांकडून मल्ल्यावर हे तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
२०१२ मध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सने विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) ५० आणि ५७ कोटी असे दोन चेक दिले. मात्र, हे दोन्ही चेक बाउन्स झाले. त्यामुळे एएआयने मल्ल्या व अन्य पाच जणांवर गुन्हा नोंदवला. अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी या केसवरील सुनावणीदरम्यान मल्ल्याला न्यायालयात हजर राहण्यापासून वगळले होते. मात्र, मल्ल्या देश सोडून पळाल्याने त्याला न्यायालयात हजर न राहण्याची देण्यात आलेली सवलत रद्द करावी आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, अशी मागणी एएआयने दंडाधिकाऱ्यांकडे केली.
गेल्या सुनावणीच्या वेळी दंडाधिकाऱ्यांनी मल्ल्याला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, शनिवारी मल्ल्या न्यायालयात हजर न राहिल्याने, दंडाधिकाऱ्यांनी मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले. मात्र, मल्ल्याच्या वकिलांनी केंद्र सरकारने मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केल्याने त्याला न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याचे सांगितले. सध्या इंग्लंडला असलेल्या मल्ल्याविरुद्ध भारतीय न्यायालयांनी तीन अजामीनपात्र वॉरंट जारी केली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Unlawful Warrant issued against Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.