अवैधरित्या विकले जाणारे कफ सीरप जप्त
By Admin | Updated: October 28, 2015 01:44 IST2015-10-28T01:44:24+5:302015-10-28T01:44:24+5:30
मुंबईमध्ये अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या चार प्रसिद्ध कंपन्यांच्या १४ हजार ५०० कफ सीरपच्या बाटल्या २६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केल्या

अवैधरित्या विकले जाणारे कफ सीरप जप्त
मुंबई: मुंबईमध्ये अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या चार प्रसिद्ध कंपन्यांच्या १४ हजार ५०० कफ सीरपच्या बाटल्या २६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केल्या. दोन ठिकाणी छापे टाकून १५ लाख रुपये किमतीच्या बाटल्या जप्तीची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दलाराम चौधरी नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. दुसरा आरोपी भारत चौधरीचा शोध सुरू असल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
सोडियम फॉस्फेट घटकद्रव्य असलेल्या कफ सीरपची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एफडीए अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ग्राहक बनून सीरपची खरेदी केली. त्यानंतर हे छापे टाकण्यात आले. २६ आॅक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथील फाऊंटन हॉटेलमध्ये एफडीएने धाड टाकली. त्यावेळी दलाराम चौधरी याच्याकडे सीरपच्या बाटल्यांचे मारुती स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये ठेवलेले आठ खोके जप्त करण्यात आले. चौधरीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत दक्षता कक्षाचे ओ.एस. साध्वानी, कोकणचे सहायक आयुक्त आर.एस. उरुणकर, जे.बी. मंत्री, डॉ. राकेश तिरपुडे, व्ही.ए.कोसे, ए.टी.राठोड, यू.जी वाघमारे, पी.एच. महावार, पोंगळे, एस. देशमुख हे अधिकारी सहभागी होते. (प्रतिनिधी)