Join us  

विद्यापीठाने आपत्कालीन निधीतून महाविद्यालयांना करावी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:43 AM

कोविड-१९ च्या परिस्थितीतून सावरत असताना देशात दुसरी संभाव्य लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे निर्देश होते. 

मुंबई :  कोविड-१९ च्या परिस्थितीतून सावरत असताना देशात दुसरी संभाव्य लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे निर्देश होते.  मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यावर ३० ते ५० टक्के आणि नंतर पूर्ण संख्येने शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी महाविद्यालये, विद्यापीठांत उपस्थित राहू लागले.  आधीच लॉकडाऊन आणि प्रवेश प्रक्रियेवर झालेला परिणाम यामुळे शिक्षणसंस्था, महाविद्यालयांचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या कारणास्तव विद्यापीठ, महाविद्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठाने आपत्कालीन निधीतून मदत करावी, अशी मागणी युवा सेना सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांच्या उन्हाळी स्तर परीक्षांची घोषणा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर्स घेणे, मूल्यांकनाच्या तयारी करणे यांसारख्या कामांसाठी अद्यापही काही ठिकाणी ५० तर काही ठिकाणी १०० टक्के शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत उपस्थित राहत आहेत. आपत्कालीन निधीचा वापर करून थर्मोमीटर, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करावे आणि सुरक्षिततेसाठी हातभार लावावा अशी मागणी युवा सेना सिनेट सदस्यांनी केल्याची माहिती प्रदीप सावंत यांनी दिली. ‘मदत केल्यान ऑनलाइन शिक्षण सोपे होईल’सध्या ऑनलाइन शिक्षण ही शिक्षणसंस्था व विद्यार्थी या दोघांची गरज आहे. याचा विचार करून दादर व वरळी येथील शाळा आणि महाविद्यालयांना तेथील नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी सिनेट सदस्यांच्या उपस्थितीत संगणक वाटप केले. विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाची गरज समजून घेऊन प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी पुढे येऊन त्या त्या प्रभागातील विद्यार्थ्यांना, शिक्षण संस्थांना मदत केल्यास ऑनलाइन शिक्षण सोपे होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबईशिक्षण