Join us

आॅनलाइन मूल्यांकनासाठी विद्यापीठ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:24 IST

प्रभारी कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती : निकालाच्या कामाची आकडेवारी जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाने मागील आठ महिन्यांत संगणकाधारित मूल्यांकन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करून, अधिक जलद आणि सदोष पद्धतीने निकाल लावण्यासाठी प्राथमिकता दिली आहे. अनेक अडचणी आणि आव्हानांना समोर जात, विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन निकालांना प्राथमिकता देऊन वेळेत निकाल जाहीर केले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील संगणकाधारित मूल्यांकनासाठी विद्यापीठ सज्ज होत असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेसाठी आॅनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांची आणि निकालाच्या कामाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी, शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळास कारणीभूत ठरलेल्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यास, परीक्षा विभाग आणि कंपनीला यश आल्याची घोषणा या वेळी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली. त्यामुळे निकालाच्या कामांसाठी वेग वाढला असून, या प्रक्रियेत काही बदल ही करण्यात आल्याने, त्याचा फायदा येत्या काळात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विद्यापीठाने संगणकाधारित मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करून, द्वितीय सत्र २०१७ च्या ४०२ परीक्षांपैकी एकूण ३८४ निकाल यशस्वीरीत्या जाहीर केले आहेत. आजमितीस प्रथम सत्र २०१८च्या एकूण ४ लाख ३७ हजार ५६१ उत्तरपुस्तिकांपैकी ३६ हजार ५३२ उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आता थेट पुनर्मूल्यांकनाच्या अर्जाची संधीआॅनलाइन असेसमेंट प्रक्रियेत बदल करताना, परीक्षा व मूल्यमापन विभागाने अनेक बदल केले आहे. ज्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना यापुढे पुनर्मूल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी कॉलेजांकडे अर्ज करण्याची गरज भासणार नसून, ही प्रक्रिया पूर्णत: आॅनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट अर्ज करता येणार असून, त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास मदत होणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्राप्त झालेल्या ५१ हजार ५८६ अर्जांपैकी ४३ हजार २३९ अर्जांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.द्वितीय सत्र २०१७ परीक्षेसाठी विद्यापीठाकडे एकूण १५ लाख १४ हजार ६ उत्तरपुस्तिका संगणकाधारित मूल्यांकनासाठी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १४ लाख ९६ हजार ४४४ उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असून, फक्त १७ हजार ५५२ एवढ्या उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच यापैकी नियमनासाठी(मॉडरेशन) एकूण १ लाख ८२ हजार १८२ उत्तरपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी १ लाख ८१ हजार ४६६ उत्तरपुस्तिकांचे नियमन झाल्याचे त्यांनी सांगितले.नव्याने डॅशबोर्ड निर्मिती : आॅनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करताना, विद्यापीठाने विद्यापीठ आणि कॉलेजांच्या प्राचार्यांना या संदर्भातील माहिती देण्यासाठी नव्याने डॅशबोर्ड विकासित केला आहे. त्यामुळे निकालाच्या कामांचा आढावा घेणे शक्य असणार आहे.१८ निकाल बाकीच : हिवाळी सत्र परीक्षांच्या एकूण ४०२ निकालांपैकी अद्याप १८ निकाल जाहीर होणे बाकी असल्याची माहिती अर्जुन घाटुळे यांनी दिली. हे उर्वरित निकाल येत्या १० दिवसांत जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले आहे. आतापर्यंत ३८४ निकाल जाहीर करण्यात आले असून, एकूण ४५ हजार ८०७ विद्यार्थ्यांचे निकाल बाकी आहेत.

टॅग्स :शैक्षणिक