Join us

बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन विद्यापीठाकडून खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:15 IST

दुहेरी पदवीसोबत ट्विनिंग पदवीला विद्या परिषदेची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधीचे दालन मुंबई विद्यापीठात खुले करण्यात येणार आहेत. त्यासाठी दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे. 

दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत आता विद्यार्थ्याला दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार असून, त्यास शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळणार आहेत. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स किंवा ऑनलाइन पद्धतीने  किंवा एक प्रत्यक्ष आणि एक डिस्टन्स अशा पद्धतीने दिली जाऊ शकते. मात्र, आता या व्यतिरिक्त, या नवीन तरतुदी अंतर्गत दोन्ही डिग्री आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. परंतु, यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रीतसर अनुमती घेऊन व शैक्षणिक सामंजस्य करार करणे गरजेचे राहणार आहे. शिवाय दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर हे  ५-२० कि.मी. असावे लागणार आहे.

सह पदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्न महाविद्यालये इतर उच्च शिक्षण संस्था किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे यासाठी विद्यापीठाची परवानगी बंधनकारक असणार आहे.  मुंबई विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय करणाच्या दिशेने पाऊल टाकत सह पदवीच्या शिक्षणासाठी सेंट लुईस आणि मॉस्को स्टेट विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, तर ट्विनिंग डिग्रीसाठी फ्रान्स व इटलीतील विद्यापीठांशी करार केले आहेत.

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस मान्यताविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीस विद्यापरिषदेने मान्यता दिली आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्या शाखीय शिक्षणामुळे दोन उच्च शिक्षण संस्थांमधील प्रगत ज्ञानशाखेचे सखोल अध्ययन व संशोधन, तसेच ज्ञानाच्या देवाण-घेवाण प्रक्रियेमुळे शिक्षण प्रणालींमध्ये मोठा बदल पाहावयास मिळेल. - प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ