Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 21:14 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची मोहोर

मुंबई : १६ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्यमध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. ७ ते ११ डिसेंबर २०१८ दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर उमटली आहे.

विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने तब्बल १५ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे.  वाडमय, ललितकला, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ८७ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेते पद मिळवून अव्वलस्थान पटकावलं आहे. तर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ४८ गुण मिळाले आहेत.  या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्यमध्ये राज्यातील १९ विद्यापीठे सहभागी झाली होती.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, वाद-विवाद, रांगोळी, मातीकाम,पाश्चिमात्य एकक, पाश्चिमात्य समूह गायन, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकल शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य या विभागांमध्ये  प्रथम पारितोषिक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबत विविध स्तरावरील सर्वसाधारण चषकांमध्ये ललितकला विभाग, संगीत विभाग, नाट्य विभाग आणि नृत्य विभागात प्राविण्य मिळविले आहे. विशेष म्हणजे  सुजेश मेनन याला गोल्डन बॉय तर कुमारी श्रावणी महाजनी या विद्यार्थीनीला गोल्डन गर्लचे पारितोषिक देऊन भूषविण्यात आले.ललिकला विभागासाठी डॉ. बालाजी भांगे, संगीत विभागासाठी सिद्धेश जाधव, सुमित चाचे, विजय जाधव, नाट्य विभागासाठी  निलेश गोपनारायन, महेश कापरेकर, सागर चव्हाण, नृत्य विभागासाठी वैभव सतरंगे, अमोल बावकर आणि निलेश सिंगा या सर्वांचे सहकार्य लाभले असून सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी यशस्वीरित्या या स्पर्धेचे नियोजन केले होते.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ