Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाला प्रतीक्षा प्र-कुलगुरूंची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:11 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा गोंधळ सुरूच आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाने नुकतीच नवीन कुलगुरूंची निवड केली असली तरी परीक्षेच्या निकालाचा गोंधळ सुरूच असून विद्यापीठाचा कारभार सुरळीत होण्यासाठी विद्यापीठातील प्रभारी प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक या पदांची प्रतीक्षा आहे.मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा गोंधळ सुरूच आहे. जे निकाल लागले त्यांच्यात संभ्रम आहे. त्यामुळेच प्रभारी प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक ही पदे भरणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही केली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि राज्यपाल विद्यासागर राव यांना मागणीचा मेल पाठवला.परीक्षा नियंत्रकांनी निकाल वेळेत का जाहीर होऊ शकले नाहीत याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेला यांनी म्हटले आहे. निकालांचा दर्जाही खालावल्याचा आरोपही केला आहे. दोन परीक्षांचे वेळापत्रक एकत्र जाहीर करण्यात येत आहेत. पूर्ण वेळ अधिकारी असते तर हा गोंधळ कमी झाला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने लवकरात लवकर प्रभारी प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक ही पदे भरावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशैक्षणिक