मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या नरिमन पॉईंट येथील मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात सुविधांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. दिवे नाही, पाणी नाही, खाणावळ बंद, त्यातच एका मजल्यावर कोसळलेला छपराचा भाग, त्यात पूर्णवेळ वॉर्डनही नाही, अशा सर्व परिस्थितीमुळे विद्यापीठ प्रशासनाला सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
१२६ विद्यार्थिनींचे वास्तव्य असलेल्या या वसतिगृहातील खाणावळ गेल्या १५ दिवसांपासून बंद असून विद्यार्थिनींना बाहेरून नाश्ता आणि जेवण मागवावे लागत आहे. येथे अनेक मजल्यांवरील दिवे बंद आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधाही उपलब्ध नाही, अशा तक्रारी युवा सेनेकडे आल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी शुक्रवारी वसतिगृहाची पाहणी केली. आता युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे.
वसतिगृहात सातपैकी केवळ तीन मजल्यांवर वॉटरकुलर आहेत, तर प्रत्येक मजल्यावर बाथरूममध्ये अंघोळीकरिता फक्त दोन गिझर आहेत. वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील छप्पर कोसळले आहे, असे युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी पाहणीनंतर सांगितले.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची भीतीविद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसबाहेर हे वसतिगृह आहे. मात्र, असे असतानाही वसतिगृहात पूर्णवेळ वॉर्डन नाही. वॉर्डन केवळ दोन तास येऊन जातात. मंत्रालयाजवळ असलेल्या या वसतिगृहाची ही अवस्था असेल, तर राज्यातील अन्य वसतिगृहात काय परिस्थिती असेल? त्यातून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाने तत्काळ पूर्णवेळ वॉर्डन नियुक्त करावा, अशी मागणी युवा सेनेच्या नेत्या आणि व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. शीतल शेठ देवरुखकर यांनी केली.
आरोप खोटे, भेट देणाऱ्यांवर कारवाईचे संकेतप्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वसतिगृहाच्या वॉर्डन नसताना मुलींच्या वसतिगृहाला भेट देणे बेकायदा आहे. मात्र, तरीही युवा सेनेचे सिनेट सदस्य तसेच अन्य लोक वसतिगृहात गेले. या भेट देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत विद्यापीठाने दिले. वसतिगृहातील खाणावळ १० दिवस बंद होती. मात्र, आता ती सुरू आहे. पाण्याचे पुरेसे कूलर्स असून गीझरबाबतही कोणाची तक्रार नाही. सर्व दिवेही सुरू आहेत. येथे कोणतेही छप्पर कोसळलेले नाही. तसेच वसतिगृहात पूर्ण वेळ वसतिगृह अधीक्षिका असल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे.
प्रवेशाचे निकष असे...वसतिगृहात प्रवेश देताना मुंबई विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयांना खोल्या उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित रिकाम्या खोल्या विद्यापीठाशी संलग्न इतर महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना देण्यात याव्यात, असा निकष आहे. मात्र ते पाळले गेले नाहीत, असाही आरोप आहे.