Join us  

मेगालॅब उभारणीसाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलला मुंबई विद्यापीठाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 6:18 PM

मेगालॅबच्या माध्यमातून १ कोटी चाचण्या अपेक्षित 

मुंबई :  आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलतर्फे मुंबईत उभारण्यात येत असलेल्या मेगालॅब या उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. या मेगालॅबच्या माध्यमातून कोव्हिड-१९ च्या निदानासाठी दरमहिन्याला १ कोटी चाचण्या केल्या जाणार आहेत. मेगालॅबच्या माध्यमातून कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे आणि इतर संसर्गजन्य आजारामुळे संक्रमीत  झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.कोव्हिड-१९ आणि इतर संसर्गजन्य आजारापासून संक्रमीत झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेगालॅब मुंबई ही जगातील एकमेव चाचणी सुविधा म्हणून नावारुपाला येणार आहे. मुंबईत वैद्यक क्षेत्रातील अद्ययावत आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी मॅगालॅबच्या स्थापनेसाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलतर्फे मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने या मेगालॅब प्रकल्पासाठी मुंबई विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधन पायाभूत सुविधा यादृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाची मोठी भूमिका असणार आहे. मुंबई शहरातील संपूर्ण लोकसंख्येची कोव्हिड-१९ सह इतर संसर्ग आजारांची तपासणी करण्याची क्षमता निर्माण करणारी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत सुविधा असल्याचे आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले.

कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलने पुढाकार घेऊन संशोधक, विद्यार्थी, व्यावसायिक, कॉर्पोरेट, स्टार्टअप आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाना प्रेरणा देऊन या संकटावर मात करण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रयोगांना चालना दिली आहे. त्यातील एक भाग म्हणून डॉ. मुफ्फजल  लकडावाला आणि त्यांचे सहकारी, यांच्या मदतीने काउन्सिलने कृत्रीम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने  कोव्हिडचे निदान करू शकणाऱ्या क्ष किरण यंत्रांची उभारणी यशस्वीरित्या केली. त्यानंतर आठवड्याभरात सम्पर्करहित विलगीकरण केंद्राची उभारणी संघाच्या मदतीने नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया  मुंबई इथे करण्यात आली. क्ष किरण यंत्रांच्या संरचनेत स्वदेशी अश्या अत्यंत आटोपशीर आकाराच्या अल्ट्रा साऊंड स्कॅनरचा अंतर्भाव करून सुधारणा करण्यात आली. आता कोव्हिड बस मधील ही यंत्रणा एका लहान टॅक्सीमधे सामावू शकते.टेस्ट किट्सची कमतरता भासत असल्याने पूल टेस्टिंगसाठीची प्रणाली शोधण्यासाठी स्पर्धा घेऊन त्यातून पुढे आलेल्या उत्तम कल्पनांची  प्रतिथयश परिक्षकांनी निवड केली, आणि या प्रणाली भारत सरकारकडे पाठवल्या गेल्या. १ मे २०२० ला अ‍ल्युमिनाय काउन्सिलने स्वदेशी बनावटीच्या टेस्ट किट्सच्या निर्मितीवर आपले लक्ष केंद्रित केले. काउन्सिलमधल्या अनेक छोट्या गटांनी १०० टक्के स्वदेशी टेस्ट किट्सची निर्मिती केलेली आहे. ही टेस्ट किट्स आता निर्मितीच्या आणि विक्री परवाना मिळवण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. भारत, चीन, आसीआन, मध्यपूर्व, आफ्रिका आणी लॅटीन अमेरिकेतल्या अनेक विकसनशील देशांची गरज भागेल इतक्या प्रमाणात या किट्सची निर्मिती करण्याची पायाभूत सुविधा भारतात निर्माण करण्याचा काउन्सिलचा प्रयत्न आहे. मेगालॅब मुंबई या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून कोव्हीड-१९ सह क्षयरोगापासून संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या सुमारे १ कोटी चाचण्या दर महिन्याला केल्या जाणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर देशातील इतर भागासह विकसनशील देशात अशा सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.  यामध्ये  मुंबई विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नेनोटेक्नोलॉजी विभाग आणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून एकत्रिक काम केले जाणार आहे. कोरोना विषाणूशी लढाईत आघडीवर असलेले कितीतरी डॉक्टर्स मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत, आणि त्यांच्या या सहभागाचा आम्हाला अभिमान आहे. आयआयटी एल्युमनी काउन्सिलबरोबर मेगॅलॅब उपक्रमात सहभागी झाल्याने आमच्या विद्यार्थ्याना आणि प्राध्यापकांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होईल, आणि मॉलेक्युलर डायग्नॉस्टिक्स आणी जेनेटिक टेस्टिंग या क्षेत्रातल्या नविन तंत्रज्ञानाच्या निर्मितीत सहभागी होता येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. आयआयटी एल्युमनी काउन्सिलच्या मेगॅलॅब मुंबई या उपक्रमामुळे मुंबई विद्यापीठाच्या नॅनोसायन्स सेंटरमध्ये ‘इंजिनियर्ड बायोमॉलेक्यूल मॅन्युफॅक्चरिंग इनिशिएटिह’या उपक्रमाचा एक भाग म्हणून एका विशेष दर्जाच्या प्रयोगशाळेची निर्मिती होत आहे. या प्रयोगशाळेत कोव्हिड-१९ आणि  इतर संसर्गजन्य आजारांवर  संशोधन केले जाईल. या संशोधनातून मिळालेले ज्ञान आणि निर्माण झालेली माहिती कोव्हिड -१९ चा प्रतिबंध आणि उपचारांबरोबरच क्षयरोगांसारख्या इतर रोगांबाबत उपाय शोधण्यात मोलाची ठरेल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी यांनी दिली. 

 

बायोटेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील बायोसायन्सेस संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने भरीव कामगिरी केली आहे. त्यातीलच पुढील टप्पा म्हणून आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलसोबत भागीदारी करुन मॉलेक्युलर डॉयग्नोस्टिक आणि जेनेटिक टेस्टिंगकरीता जगातील सर्वात मोठ्या मेगालॅबसाठी विद्यापीठ पुढे येत असून याद्वारे १ कोटी चाचण्या या दर महिन्याला होऊ शकतील.   

- डॉ सुहास पेडणेकर , कुलगुरू , मुंबई विद्यापीठ 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस