Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदवी अभ्यासाच्या प्रवेशांना विद्यापीठाची मुदतवाढ, पहिली यादी १९ जूनला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 12:51 IST

सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ लाख ६६ हजार ४४२ अर्ज आले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नावनोंदणीसाठी आता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना १५ जूनच्या दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करता येणार आहे. 

आतापर्यंत तब्बल २ लाख १० हजार ४८२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशपूर्व नावनोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडे सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ लाख ६६ हजार ४४२ अर्ज आले आहेत. पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर हाेईल.

दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी २८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता जाहीर होईल. पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क ७ ते १० जुलै या कालावधीत भरणे बंधनकारक असेल.

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठीही संधी

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई)  राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के जागांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत सोमवारी संपली. मात्र, अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्याने या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबवल्या जाणाऱ्या २५ टक्के कोटा प्रवेशातील नियमित प्रवेश फेरीनुसार राज्यातील ६४ हजार २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना शाळेतील रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येत आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण