Join us

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात १३ टक्क्यांची वाढ, १४७ कोटींची तूट; संशोधन, उपक्रमांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 05:52 IST

मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प ९६८ कोटी १८ लाख रुपयांचा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या वर्षाचा ९६८ कोटी १८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आला. विद्यापीठाने यंदा १४७ कोटी ६३ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद १३ टक्क्यांनी वाढली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठाने संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीचे बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रम यांसह शैक्षणिक आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता उपक्रमांसाठी यंदा ७५ कोटींची भरीव तरतूद केली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते.

नवीन योजना

  • १० कोटी : गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता शैक्षणिक उपक्रम
  • १५ कोटी : संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार 
  • ५ कोटी : विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रम
  • ५ कोटी : माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ- औद्योगिक साहचर्य उपक्रम 
  • ५ कोटी : उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार
  • ३५ कोटी : गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता गव्हर्नन्स उपक्रम

नावीन्यपूर्णतेला प्राधान्य

अर्थसंकल्पात विद्यापीठाने संशोधन व नावीन्यपूर्ण संस्कृती बळकटीकरणावर विशेष भर आहे. हवामान अनुकूलता विकास, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरे, स्मार्ट गतिशीलता आणि वाहतूक विषयांवरील संशोधनाला चालना देण्यासाठी १५ कोटींची तरतूद विद्यापीठाने केली आहे. 

विद्यार्थी साह्यासाठी तरतूद

विद्यापीठाने विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रमांसाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये सिंगल विंडो सिस्टीम आणि स्टुडंट हेल्प डेस्क, लर्नर सपोर्ट सिस्टीम, समान संधी सेल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य इ.चा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठअर्थसंकल्प 2024