Join us

भिलवले गावातील आदिवासींना नवीन दृष्टी देणारा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 06:33 IST

भिलवलेत मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध आदिवासी राहतात. सलोनी भल्ला आणि त्यांच्या द सी चेंज प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी या गावाला भेट दिली.

मुंबई : कर्जत तालुक्यातील भिलवले गाव हा तसा अतिशय दुर्गभ भाग. कोणत्याही सोयीसुविधांविना असणाऱ्या या गावात आदिवासी अतिशय गुण्यागोविंदाने आपलं आयुष्य जगत असतात. त्यांच्या आयुष्याला नवीन दृष्टी देण्याचं काम उद्योजिका, समाजसेविका सलोनी भल्ला आणि त्यांच्या टीमने ‘लोकमत वृत्तसमूहा’च्या मदतीने त्यांच्या ‘द सी चेंज’ या प्रोजक्टच्या माध्यमातून केले.

भिलवलेत मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध आदिवासी राहतात. सलोनी भल्ला आणि त्यांच्या द सी चेंज प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांनी या गावाला भेट दिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की यातील बहुसंख्य गरीब आदिवासींकडे चष्मा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रानावनात भटकत असताना, कामासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाताना या वयोवृद्ध आदिवासींना वयोमानानुसार दृष्टी कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. याचे निवारण करण्यासाठी द सी चेंज प्रोजेक्टच्या माध्यमातून नुकतेच भिलवले गावाला भेट देण्यात आली; आणि गावातील तब्बल १०० घरांतील वयोवृद्ध आदिवासी पुरुष आणि स्त्रियांना मोफत चष्मावाटप करण्यात आले. चष्मा घातल्यावर या आदिवासींच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कार्यक्रमावेळी भिलवले गावातील आदिवासींना लोकमत वृत्तपत्राचेही वाटप करण्यात आले. 

टॅग्स :मुंबई