सीमावर्ती भाग केंद्रशासित करा-- राणे अस्तित्व संपलेले नेते
By Admin | Updated: August 5, 2014 23:19 IST2014-08-05T23:05:12+5:302014-08-05T23:19:48+5:30
उद्धव ठाकरे : केसरकरांसह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सीमावर्ती भाग केंद्रशासित करा-- राणे अस्तित्व संपलेले नेते
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज, मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. केसरकर यांच्यामुळे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार भगवे झाले आहे. येत्या निवडणुकीत राज्यातही भगवा फडकेल, असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्नाटक शासन मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. आम्ही लाठी उगारली, तर आमच्यावर टीका होईल; पण यापुढे आम्ही शांत बसणार नाही. कानडी लांडगे घरात घुसून अत्याचार करीत आहेत. मात्र, सर्वजण मूग गिळून गप्प बसले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडला आहे. आपण केंद्र शासनाकडे सीमावर्ती भाग केंद्रशासित करा, अशी मागणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ज्यांचे अस्तित्वच संपले, त्यांच्याबद्दल काय बोलायचे, असे सांगत त्यांनी नारायण राणे यांच्यावर भाष्य टाळले.राक्षसी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी शिवसेनेने मला ताकद द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
राणे अस्तित्व संपलेले नेते
नारायण राणे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचे अस्तित्वच संपले, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? ब्रह्मदेवाचा बापही आपले काही करू शकणार नाही, असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच कायमचे संपविले आहे. चिपी विमानतळ मी पूर्ण करीनच; पण ज्यांच्या जमिनी लाटल्या त्या परत करू, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
गणपतीची आरती करणार
महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाच्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, गणेशोत्सव हा होणारच आणि आपण स्वत: या गणेशोत्सवात आरती करण्यासाठी जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले.
जैतापूर प्रकल्पाला विरोधच
जैतापूर प्रकल्प स्थानिकांना नको असल्यास होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जाऊन वीज विकत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी जैतापूर घेऊन जावा. आम्ही त्यांच्याकडून वीज विकत घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेनेचा जैतापूरला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.