मुंबई : दोन महिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून ६५ वर्षीय पत्नीने ७५ वर्षीय पतीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना मंगळवारी टिळकनगरमध्ये उघडकीस आली. लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, पोलीस तपासात हा बनाव उघडकीस आला.चेंबूर पूर्वेकडे छोटेलाल मौर्या (७५) हे पत्नी धनूदेवीसोबत राहायचे. त्यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. छोटेलालच्या मालकीची चार दुकाने आणि भाजीविक्रीचा व्यवसायही आहे. मौर्या यांचे दोन महिलांशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे ते पत्नी धनूदेवीकडे दुर्लक्ष करत असत. अनेकदा मौर्या घरात त्यांच्या प्रेयसींसोबत असायचे. यावरून पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. याच रागातून रविवारी सायंकाळी मौर्या झोपले असताना धनूदेवीने डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून त्यांचा खून केला.याप्रकरणी प्राथमिक तपासात लुटीच्या उद्देशाने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, पत्नीकडे उलटतपासणी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर धनूदेवीला अटक करण्यात आली.
दोन महिलांशी अनैतिक संबंध, वृद्धाची पत्नीकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 22:24 IST