वंचितांच्या शिक्षणहक्कासाठी उपक्रम
By Admin | Updated: November 2, 2015 02:32 IST2015-11-02T02:32:32+5:302015-11-02T02:32:32+5:30
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मुलांसाठी, विशेष करून ‘रेवा झिरो’हा उपक्रम नुकताच आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये पार पडला.

वंचितांच्या शिक्षणहक्कासाठी उपक्रम
मुंबई : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मुलांसाठी, विशेष करून ‘रेवा झिरो’हा उपक्रम नुकताच आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये पार पडला. यावेळी ‘राईट टू एज्युकेशन अॅण्ड व्हिजन फॉर आॅल’ या संस्थेच्या सहाय्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले.
या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘थिंक-लर्न-अॅक्ट’ संकल्पनेंतर्गत स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध, वाचन, काव्य, नृत्य, संगीत अशा वेगवेगळ््या स्पर्धांचा आनंद लहानग्यांनी घेतला. वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या बऱ्याच संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यंदा कार्यक्रमाचे तिसरे वर्ष असून, ‘शिक्षण हक्काचा नारा’ या संकल्पनेभोवती विविध कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.
शैक्षणिक स्पर्धांसोबत या मुलांना कार्यानुभवाचे धडे देणाऱ्या बऱ्याच शिबिरांचा आस्वाद चिमुरड्यांनी घेतला. त्यात क्ले मॉडेलिंग, ओरिगामी, चित्रकला आणि शिल्पकला यांचे शिक्षण तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह दिले.
पोलिसांची भूमिका ही कायम लहान मुलांच्या बाजूनेच राहिलेली आहे. लहानपणापासूनच गुन्हेगारी वृत्तीपासून आणि या क्षेत्रापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी पोलीस कायम कार्यरत आहेत, परंतु मुळात गुन्हेगारी असो वा कोणतीही चुकीचे काम, यापासून परावृत्त करण्यासाठी या मुलांना शिक्षणाची दालने उघडणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला हा प्रयत्न स्तुत्य आहे, असे मत महासंचालक, (लिगल व टेक्निकल) विभागाच्या मीरा बोरवणकर यांनी मांडले. (प्रतिनिधी)