Join us  

मेट्रोच्या कामामुळे रेल्वेच्या हेरिटेज मुख्यालयाला हादरे; स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:07 AM

गेल्या आठवडाभरापासून अशा प्रकारचे धक्के बसत आहेत. दिवसाला ७ ते ८ स्फोट घडवून आणले जातात. दुपारनंतर जास्तप्रमाणत हे स्फोट घडतात

मुंबई - शहरात सुरु असणाऱ्या भूयारी मेट्रोच्या कामामुळे हेरिटेज इमारतींना हादरे बसत असल्याचा प्रकार दक्षिण मुंबई घडत असल्याचं समोर आलं आहे. भूयारी मेट्रोच्या ओव्हल मैदानाच्या ठिकाणी भूमीगत स्फोट घडवून आणल्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गाच्या 120 वर्ष जुन्या मुख्यालयाला अन् आसपासच्या रस्त्यावर सौम्य भूकंपासारखे धक्के बसत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात काम करणारे कर्मचारी सांगतात की, गेल्या आठवडाभरापासून अशा प्रकारचे धक्के बसत आहेत. दिवसाला ७ ते ८ स्फोट घडवून आणले जातात. दुपारनंतर जास्तप्रमाणत हे स्फोट घडतात. या स्फोटामुळे मुख्यालयाच्या खिडक्यांना हादरे बसतात. तळमजल्यापासून दुसऱ्यामजल्यापर्यंत हे धक्के जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

एमएमआरसीकडून जवळपास २३ हजार कोटींचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशा भूयारी मार्गाचे काम सुरु आहे. या कामानिमित्त होणारे स्फोट हे मर्यादेत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना नुकसान होणार नाही असं एमएमआरसीने स्पष्ट केलं असलं तरी पश्चिम रेल्वेकडून कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामधून इमारतीचे पिलर आणि अन्य भागात काही नुकसान झालं आहे का? याची पडताळणी करण्यात येईल. 

याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, टर्मिनसच्या मुख्य इमारतीमध्ये स्फोटामुळे काही नुकसान झालं आहे का याची तपासणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही हेरिटेज वास्तू आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. एमएमआरसीकडून आम्हाला खबरदारी घेत असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी आवश्यक अशी पावलं रेल्वेकडून उचलण्यात येत आहेत. 

मुख्यालयात नोव्हेंबर महिन्यापासून अशाप्रकारे धक्के जाणवत आहेत. मात्र अलीकडे याचे प्रमाण वाढलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वास्तू १८८९ मध्ये बांधण्यास सुरुवात झाली होती तर १८९९ मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झालं. याबाबत हेरिटेज विभागाचे आर्किटेक्ट सांगतात की, भूयारी मेट्रोच्या कामासाठी घालून दिलेल्या अटीमध्ये हे काम करणं आवश्यक आहे. संपूर्ण खबरदारी घेऊन हे काम सुरु असेल अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :मेट्रोपश्चिम रेल्वेभूकंप