कोणत्या कायद्यांतर्गत खासगी रस्त्यावरून मिरवणूक?
By Admin | Updated: September 8, 2015 05:05 IST2015-09-08T05:05:49+5:302015-09-08T05:05:49+5:30
गृहनिर्माण सोसायटीच्या किंवा एखाद्या खासगी मालकीच्या रस्त्यावरून गणपती व देवी विसर्जनासाठी मार्गिका काढण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला आहे

कोणत्या कायद्यांतर्गत खासगी रस्त्यावरून मिरवणूक?
मुंबई : गृहनिर्माण सोसायटीच्या किंवा एखाद्या खासगी मालकीच्या रस्त्यावरून गणपती व देवी विसर्जनासाठी मार्गिका काढण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला आहे याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला सोमवारी दिले़
या प्रकरणी अभिनव नगर गृहनिर्माण सोसायटीने याचिका केली आहे़ या सोसायटीमधून दहिसर नदीकडे रस्ता जातो़ त्यामुळे गणपती विसर्जनासाठी सोसायटीने त्यांचे प्रवेशद्वार उघडे ठेवावे़ अन्यथा ते तोडण्यात येईल, अशी नोटीस पालिकेने सोसायटीला पाठवली़ ही नोटीस बेकायदा असून ती रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़
न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ ही सोसायटी ३० एकर भूखंडावर वसली आहे़ पालिकेशी झालेल्या करारानुसार यातील काही रस्ता पालिकेला देण्यात आला आहे़ मात्र याचा अर्थ पालिका सोसायटीवर कशासाठीही जबरदस्ती करू शकत नाही़ तसेच दहिसर नदीकडे जाण्यासाठी अजूनही पर्यायी रस्ते आहेत, असा युक्तिवाद अॅड़ श्रीपाद मूर्ती यांनी सोसायटीच्या वतीने केला़
याला पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी विरोध केला़ मुळात संबंधित रस्त्याची देखभाल पालिका करत आहे़ तेथे पालिकेने दिवे लावले आहेत़ त्यामुळे हा रस्ता पालिका विसर्जनासाठी वापरू शकते, असा दावा अॅड़ साखरे यांनी केला़ अखेर न्यायालयाने ही सुनावणी १४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली़